मुंबई मुंबईत बॉम्बस्फोट घडवून आणू असा कॉल सांताक्रुज येथील एका व्यक्तीस प्राप्त झाल्याने पुन्हा एकदा घबराहट पसरली आहे. बॉम्बच्या धमकीचा कॉल प्राप्त झालेल्या व्यक्तीने अज्ञात इसमाविरोधात मुंबई पोलिसात आयपीसी कलम 506 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
महिनाभरापूर्वी एका पंचतारांकित हॉटेलला देखील बॉम्बच्या धमकीचा कॉल आला होता. त्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी एका व्यक्तीस बेड्या ठोकल्या आहेत. त्यानंतर पुन्हा एका महिन्याने सांताक्रुज परिसरात राहणाऱ्या तक्रारदार व्यक्तीस अनोळखी व्यक्तीने कॉल करून मुंबईत बॉम्ब घडवून आणण्याची धमकी दिली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आलेल्या कॉलचे लोकेशन ट्रेस करण्याचे काम करत असल्याची माहिती पोलीस सूत्राने दिली आहे.
धमकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल सांताक्रुझ येथील एमआयएम पदाधिकाऱ्याला एका व्यक्तीने व्हिडिओ कॉल करून भारतात बॉम्बस्फोट घडविण्याची धमकी दिली. याप्रकरणी पदाधिकाऱ्याच्या तक्रारीवरून सांताक्रुझ पोलिसांनी अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. रफत फजाहत हुसेन यांच्या तक्रारीवरून याप्रकरणी सांताक्रुझ पोलिसांनी भादंवि कलम ५०५ (१) अ, ५०६ (२) अंतर्गत धमकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. तक्रारीनुसार हुसेन हे व्यावसायिक असून ते एमआयएम पक्षाचे मध्य मुंबईतील निरीक्षक आहेत. त्यांच्याकडील दोन मोबइल क्रमांकावर अनोळखी आरोपीने आज व्हिडिओ कॉल केला होता. त्या अज्ञात व्यक्तीने ‘बॉम्ब ब्लास्ट करना है, इंडिया मे तबाही करना है’ अशी धमकी दिली.
सोमालिया देशातील मोबाइल क्रमांकावरून पाठविला संदेश या प्रकरणानंतर हुसेन यांनी सांताक्रुझ पोलिसांना याबाबतची माहिती दिली. सांताक्रुझ पोलिसांनी गुरूवारी गुन्हा दाखल केला. आरोपीने व्हिडिओ कॉल केला होता. याबाबत अधिक तपास सुरू असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. यापूर्वी सांताक्रूझमधील एका पंचतारांकित हॉटेलला बॉम्बस्फोट घडवून आणण्याच्या धमकीचा कॉल केला होता. त्या आरोपीच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या. त्याआधी मुंबई पोलिसांच्या वाहतूक नियंत्रण कक्षाला पाकिस्तानातील एका क्रमांकावरून २६/११ सारखा भीषण दहशतवादी हल्ला करण्याची धमकी देणारे संदेश आले आहेत. त्याप्रकरणी वरळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर मुंबई वाहतूक पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला एका अनोळखी क्रमांकावरून संदेश प्राप्त झाला आहे. सोमालिया देशातील मोबाइल क्रमांकावरून हा संदेश पाठवण्यात आला होता.