मुंबई - मुंबई महापालिकेने भायखळा येथील राणीबागेत पेंग्विन कक्ष उभारला आहे. त्यात प्रशस्त 'कॅफेटेरिया' असून ते ५ वर्षांसाठी भाडे तत्वावर दिले जाणार आहे. त्यामधून पालिकेला ३ कोटी ५० लाख रुपयांचे उत्पन्न मिळणार आहे. यासंदर्भातील प्रस्ताव सुधार समितीच्या आगामी बैठकीत मंजुरीसाठी सादर करण्यात आला आहे.
कॅफेटेरियातून ३.५ कोटींचे उत्पन्न -
भायखळा येथील राणीबाग म्हणजे बच्चे कंपनी आणि पर्यटकांचे आवडते ठिकाण. राणीबागेत चार वर्षांपूर्वी हंबोल्ट पेंग्विन आणण्यात आले. तेव्हापासून पर्यटकांची गर्दी वाढली आहे. परदेशी पेंग्विनसाठी पेंग्विन कक्ष उभारण्यात आला आहे. याच कक्षाच्या बाजूला पर्यटकांसाठी ५३३ चौरस मीटर जागेत कॅफेटेरिया बनवण्यात आला आहे. हा कॅफेटेरिया मे. परिचय ग्लोबल वर्क्स या कंत्राटदाराला पुढील ५ वर्षांसाठी (६० महिने) देण्यात येणार आहे. शिवाय या कंत्राटदाराला पालिकेला दरवर्षी ५ टक्के भाडे वाढवून द्यावे लागणार आहे. पालिका सुधार समिती अध्यक्ष सदानंद परब, सदस्य व माजी महापौर श्रद्धा जाधव, रमाकांत रहाटे, शीतल गंभीर, प्राणी संग्रहालयाचे संचालक डॉ. त्रिपाठी यांनी नुकतीच कॅफेटेरियाला भेट देऊन पाहणी केली आहे. डॉ. त्रिपाठी यांनी सर्वांच्या शंकांचे समाधान केल्याने या प्रस्तावाला मंजुरी मिळणार आहे.
उत्पन्नाचे नवे स्त्रोत -
मुंबई महापालिकेचा जकात कर हा उत्पन्नाचा महत्वाचा स्रोत होता. जकात कर रद्द करून त्याजागी जीएसटी लागू करण्यात आला. २०२२ नंतर पालिकेला राज्य सरकारकडून मिळणाऱ्या दरमहा जीएसटी हप्त्याची कोट्यवधी रुपयांची रक्कम मिळणे बंद होणार आहे. यामुळे पालिकेला उत्पन्नाचे नवे स्रोत शोधण्यास सुरुवात केली आहे.
हेही वाचा - IIT MUMBAI मध्ये दलित विद्यार्थ्याच्या प्रवेश वादावर SC चा आदेश.. वाचा काय आहे प्रकरण