मुंबई - जगभरात कोरोनाचा नवा व्हेरियंट असलेल्या ओमायक्रॉन विषाणूचा (Omicron Variant) धोका वाढला आहे. हा धोका ओळखून वेळीच रुग्ण समोर यावेत तसेच उपचार वेळेवर करता यावेत म्हणून पालिकेने चाचण्या वाढवण्याचा (Corona Test) निर्णय घेतला आहे. यासाठी पालिका (BMC) प्रति नग 9 रुपये या दराने 20 लाख अँटीजन चाचण्यांचे कीट (Antigen Test Kit) खरेदी करणार आहे. यामुळे त्वरीत अहवाल येणार असल्याने कोरोना आणि ओमायक्रॉनच्या रुग्णांवर वेळीच उपचार करणे शक्य होणार असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.
- चाचण्यांचे प्रमाण वाढवण्याचा निर्णय -
मुंबईत गेले पावणे दोन वर्षे कोरोना विषाणूचा प्रसार आहे. तेव्हापासून आतापर्यंत रोज 30 ते 50 हजार कोरोना चाचण्या केल्या जात आहेत. या चाचण्यांमधून पॉझिटिव्ह येणाऱ्या आणि त्यांच्या सहवासातील लोकांवर वेळीच उपचार केल्याने कोरोना विषाणूच्या दोन लाटा थोपवण्यात पालिकेच्या आरोग्य विभागाला यश आले आहे. सध्या मुंबईत 100 ते 200 रुग्ण आढळून येत आहेत. मुंबईत सध्या कोरोना रुग्णांची संख्या कमी असली तरी मुंबईत 2 तर राज्यात 8 असे एकूण 10 ओमायक्रॉनचे रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे पालिका प्रशासन सज्ज झाले आहे. रुग्णसंख्या वाढली तर बेडची संख्या कमी पडू नये यासाठी तब्बल एक लाख बेड दोन दिवसांत अॅक्टिव्ह करता येईल, अशी व्यवस्था करून ठेवण्यात आली आहे. तसेच आता चाचण्यांचे प्रमाणही वाढवण्यात येणार असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे.
- 50 हजार कीट्स घेणार -
कोरोनाच्या नियमावलीचे पालन करा, मास्क घाला, गर्दीत जाऊ नका, सुरक्षित अंतर पाळा, हात वारंवार स्वच्छ धुवा असे आवाहन वेळोवेळी केले जात आहे. तरीही मुंबईत अनेक ठिकाणी गर्दी झालेली दिसते. या गर्दीमुळे विषाणूचा प्रसार मोठ्या प्रमाणात होऊ शकतो. याकारणाने पालिकेने अँटीजन चाचण्या वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी निविदा प्रक्रिया राबवण्यात आली आहे. त्याला पाच कंपन्यांनी प्रतिसाद दिला आहे. ज्यामध्ये किमान एका चाचणीसाठी नऊ रुपये दरही कंत्राटदाराकडून मान्य करण्यात आला आहे. स्पर्धा वाढल्याने कंपन्यांकडून कमी दर मिळाल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले. या खरेदीमध्ये सुरुवातीला पाच लाख रुपयांच्या 50 हजार कीट्स घेण्यात येणार आहेत.
- असा होणार फायदा -
आरटी-पीसीआर कोरोना चाचणीचा दर 500 वरून 350 रुपये आकारण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला आहे. ‘आरटी-पीसीआर’ चाचणीसाठी किमान 24 तासांचा वेळ लागतो. मात्र अँटीजन चाचणीचा अहवाल 30 मिनिटांत येणार आहे. त्यामुळे रेल्वे स्टेशन, मॉल, बाजारपेठा, गर्दीची ठिकाणे, सार्वजनिक ठिकाणे, बस स्थानके अशा ठिकाणी वेगाने चाचण्या करण्यासाठी या कीट्सचा फायदा होणार आहे.