मुंबई- ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झालेल्या रुग्णालयांनी ऑक्सिजन सिलिंडरची मागणी केली होती. त्याप्रमाणे 5 रुग्णालयांना 149 ऑक्सिजन सिलिंडर देण्यात आल्याची माहिती मुंबई महापालिकेच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे. ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत सुरू असल्याची माहितीही त्यांनी माध्यमांना दिली.
महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या, की मुख्यमंत्र्यांनी ऑक्सिजन पुरवठ्याबाबत बैठक घेतली आहे. ऑक्सिजनचा तुटवडा भरून काढण्यासाठी विचारनिमियम सुरू आहे. विविध रुग्णालयांना मागणीप्रमाणे ऑक्सिजन सिलिंडर देण्यात आले आहेत.
हेही वाचा-रिलायन्स 10 दिवसांत शिर्डीत एरियल ऑक्सिजन प्लांट, आरटीपीसीआर लॅब उभारणार
मुंबई महापालिकेने या रुग्णालयांना पुरवले इतके ऑक्सिजन सिलेंडर
- भाभा रुग्णालय - बांद्रा 40 सिलेंडर
- भाभा रुग्णालय , कुर्ला 70 सिलेंडर
- शताब्दी रुग्णालय , गोवंडी ,6 सिलेंडर
- एम टी अग्रवाल , मुलुंड , 25 सिलेंडर
- ट्रॉमा रुग्णालय , जोगेश्वरी 8 सिलेंडर
हेही वाचा-केंद्राकडून राज्याला रेमडेसिवीर अन् ऑक्सिजनबाबत सहकार्य नाही - मंत्री अस्लम शेख
168 रुग्णांना इतर रुग्णालयात हलविण्यात आले होते-
देशभरात कोरोनाचा उद्रेक सुरू असताना कोरोना रुग्णांकरिता ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे. कोरोना विषाणूची लागण झालेल्या रुग्णांना ऑक्सिजन, आयसीयू आणि व्हेंटिलेटरची गरज भासते. वांद्रे येथील भाभा रुग्णालय, कुर्ला येथील भाभा रुग्णालय, बोरिवलीतील भगवती रुग्णालय, गोवंडी येथील शताब्दी रुग्णालय, मुलुंड येथील एम. टी. अग्रवाल रुग्णालय, जोगेश्वरीतील ट्रॉमा रुग्णालय या सहा रुग्णालयातून मिळून 168 रुग्णांना इतर रुग्णालये व कोरोना सेंटरमध्ये 17 एप्रिलला सुरक्षितपणे स्थलांतरित करण्यात आले होते.
दरम्यान, राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. राज्याला कोरोनाचा विळखा बसला आहे. राज्यात दररोज नवीन सुमारे 60 हजार कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत. अनेक ठिकाणी ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे. तसेच काही ठिकाणी औषधांचा तुटवडादेखील निर्माण झाल्याचे चित्र दिसून आले.