मुंबई - कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी लसीकरण मोहीम सुरु आहे. यादरम्यान अंथरुणाला खिळून असलेल्या नागरिकांचे लसीकरण करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यासाठी राज्य सरकारकडून नियमावली बनवली जात आहे. नियमावली बनवली कि त्याची अंमलबजावणी केली जाईल. घरोघरी जाऊन लसीकरण करण्यात अनेक अडचणी आहेत. त्यावर मात करून हे लसीकरण करावे लागणार असल्याची माहिती महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.
अंथरुणावर खिळून असलेले नागरिक कमी -
राज्यात कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी लसीकरण सुरु आहे. घरोघरी जाऊन लसीकरण करावे यासाठी कोणत्या उपायोजना करण्यात येत आहे असे मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेला विचारले होते. त्यावर आज राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेने १ ऑगस्टपासून घरोघरी जाऊन लसीकरण करू असे स्पष्ट केले आहे. यापार्श्वभूमीवर काकाणी बोलत होते. यावेळी बोलताना राज्य सरकारने इमेल आयडी देऊन अंथरुणावर खिळून असलेल्या नागरिकांची माहिती मागवली होती. आतापर्यंत राज्यातून ३ हजार ५०५ नागरिकांची नोंद झाली आहे. यामध्ये मुंबईमधील नागरिकांची संख्या खूपच कमी आहे, असे काकाणी यांनी सांगितले.
या आहेत अडचणी -
घरोघरी जाऊन लसीकरण करण्यात काही अडचणी आहेत. एखाद्या अंथरुणाला खिळून असलेल्या नागरिकाला लस दिल्यास त्या लसीच्या बाटलीमध्ये ९ डोस तसेच राहतात. हे डोस वाया जाऊ नये याची काळजी घ्यावी लागणार आहे. जे नागरिक सहा महिन्याच्यावर अंथरुणात आहेत, अशा नागरिकांना लस दिली जाणार आहे. लस देताना अंथरुणावर असलेल्या नागरिकांच्या डॉक्टरांकडून लस देता येऊ शकते असे प्रमाणपत्र घेतले जाईल. लस दिल्यावर आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांना आणि ऍम्ब्युलन्सला अर्धा तास त्याठिकाणी तैनात ठेवावी लागणार आहे. जवळपासचे रुग्णालय सज्ज ठेवावे लागणार आहे. यासाठी पालिकेने तयारी केली असून राज्य सरकराने नियमावली केल्यावर त्याची अंमलबजावणी केली जाईल असे काकाणी यांनी सांगितले.