मुंबई - मुंबईमध्ये पावसानंतर रस्त्यांवर खड्डे पडतात. या खड्ड्यांवरून पालिकेवर दरवर्षी टीका केली जाते. ही टिका होऊ नये म्हणून पालिका खड्डे बुजवते. यंदाही रस्त्यांवर खड्डे पडल्याने पालिकेवर टीका होऊ लागली आहे. त्यानंतर खड्डे बुजवण्यासाठी पालिका कामाला लागली आहे. पालिकेचे वरिष्ठ अधिका-यांकडून रस्त्यावर उतरून कामाची पाहणी केली जाते आहे. खड्डे तात्काळ बुजवण्याच्या सूचना केल्या जात आहेत.
खड्डे बुजवण्यास सुरुवात - मागील काही दिवसांपासून जोरदार पाऊस कोसळत आहे. पावसाने विश्रांती घेताच खड्डे बुजवण्यासाठी पालिकेने सुरुवात केली आहे. या कामांची प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासु यांनी उपायुक्त (पायाभूत सुविधा ) उल्हास महाले व रस्ते विभागाचे अधिकारी यांच्या समवेत पाहणी करत आहेत. रविवारी सकाळी अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासु यांनी दहिसर आणि बोरीवली येथील खड्डे बुजवण्याच्या कामांची पाहणी करून सूचना केल्या आहेत. खड्ड्यांच्या समस्येमुळे नागरिकांना होणाऱ्या त्रासाची दखल घेत राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सर्व महापालिका आयुक्तांना आपापल्या विभागातील खड्डे तातडीने बुजवण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार महापालिका आयुक्त इकबालसिंह चहल यांनी आपत्कालीन व्यवस्थापनाची माहिती जाणून घेताना रस्त्यांवरील खड्डे तात्काळ बुजवण्याचे आदेश दिले आहेत. रविवारी पावसाने उघडीप घेतल्याने महापालिकेने खड्डे बुजवण्याच्या कामाला युद्ध पातळीवर सुरुवात केली आहे. ख़ड्डे बुजवण्याच्या कामांचा आढावा प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासु यांनी घेतला.
या रस्त्यांवरील बुजवले खड्डे - आर- उत्तर विभागात, दहिसर (पूर्व) मधील स्वामी विवेकानंद मार्गावर रामकुंवर ठाकूर जंक्शन येथील रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यात आले. आर मध्य विभागात, बोरिवली (पश्चिम) मधील स्वामी विवेकानंद मार्गावर आर. एम. भट्टड जंक्शन आदी रस्त्यांवरील खड्डे बुजवलेल्या कामाची अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांनी पाहणी केली. आर दक्षिण विभागात, कांदिवलीलिंक रोड आणि महात्मा गांधी मार्ग जंक्शन येथे रस्त्यांवरील खड्डे बुजवलेल्या कामाची तसेच आर दक्षिण विभागात, कांदिवली (पश्चिम) मधील लालजीपाडा जंक्शन येथे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणकडे सुपूर्द केलेल्या रस्त्याची सुधारणा करण्याच्या अनुषंगाने अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांनी पाहणी केली. यावेळी उपायुक्त उल्हास महाले, अशोक मेस्त्री, सहायक आयुक्त संध्या नांदेडकर सहायक आयुक्त निवृत्त्ती गोंधळी, उपप्रमुख अभियंता मनोज कामत, उपप्रमुख अभियंता भाग्यवंत लाटे आदी अधिकारी उपस्थित होते.