मुंबई - मंदिराच्या समोर, रस्त्यांच्या कडेला गाईंना बांधणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी भाजपच्या नगरसेविका नेहल शाह यांनी केली होती. त्यांच्या मागणीवर पालिका प्रशासनाने दहा हजार रुपये दंड आकारण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत बोलताना भाजप गाई बाबात दुट्टप्पी भूमिका घेत आहे, अशी टीका मुंबई पालिकेतील विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केली आहे.
गायीचा मुद्दा भावनिक -
मुंबईत मंदिरांच्या बाहेर गायी बांधल्या जातात. श्रद्धाळू त्यांना चारा देतात. भाजपच्या नगरसेविकेने गायीला बांधून चारा देणाऱ्यांवर कारवाई करताना श्रद्धाळूंच्या श्रद्धेला ठेच पोहचणार आहे. हा मुद्दा भावनिक असल्याने गायींना पकडून दंड आकाराने योग्य ठरणार नाही. पालिकेकडून गायी आणि गुरांना पकडून मालाड येथील कोंडवाड्यात टाकले जाते. त्याठिकाणी गायी आणि गुरांना नेण्यासाठी आणि ठेवण्यासाठी पालिकेकडे सुविधा आहेत का असा प्रश्न रवी राजा यांनी उपस्थित केला आहे. अशा कारवाईमुळे धार्मिक भावना भडकल्या जाण्याची शक्यता असल्याने या प्रस्तावाला आम्ही विरोध करू असे रवी राजा यांनी सांगितले.
काय आहे नेमके प्रकरण?
रस्त्याच्या कडेला किंवा मंदिराबाहेर गायी आणि गुरांना बांधले जाते. त्याठिकाणी अस्वच्छता पसरत असल्याने अशा लोकांवर कारवाई करावी. त्यासाठी दंडाच्या रक्कमेत वाढ करावी अशी मागणी भाजपच्या नगरसेविका नेहल शाह यांनी केली होती. त्यावर पालिका प्रशासनाने कडक कारवाई करण्यासाठी आकारण्यात येणाऱ्या अडीच हजार रुपयांच्या दंडात वाढ करून दहा हजार रुपये इतका दंड आकारला जाईल असा अभिप्राय दिला आहे. भाजप नगरसेविकेच्या ठरावाच्या सूचनेवर इतक्या मोठ्या प्रमाणात दंडाची रक्कम आकारण्याचा निर्णय घेण्यातल्याने याबाबत राजकीय वर्तुळात उलट सुलट चर्चा सुरु झाली आहे.