मुंबई - महापालिकेकडून चालवण्यात येणाऱ्या बालवाड्यांमधील शिक्षिकांना आणि मदतनिसांना असलेले मानधन दुप्पट केले जाणार आहे. त्यासाठी पालिका आयुक्तांनी होकार दिला असून स्थायी समितीची मंजुरी मिळताच मानधन दुप्पट केले जाणार आहे. स्थायी समिती अध्यक्षांनीही प्रस्ताव आल्यावर त्वरित मंजूर केला जाईल, असे आश्वासन दिले आहे. यामुळे पालिकेच्या 898 बालवाड्यांमध्ये काम करणाऱ्या शिक्षिका आणि मदतनिसांना दिलासा मिळणार आहे, अशी माहिती रिपब्लिकन सेनेचे रमेश जाधव यांनी दिली.
मुंबई महानगरपालिकेकडून विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण दिले जाते. त्यासाठी विद्यार्थ्यांना 27 शालेय वस्तू, टॅब मोफत दिले जातात. त्यानंतरही पालिका शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. पालिका शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या वाढावी यासाठी पालिकेच्या अखत्यारीत येणाऱ्या बालवाड्यांमधील विद्यार्थ्यांना थेट पालिकेच्या शाळांमध्ये प्रवेश देण्याचा निर्णय घेण्यात आला.
बालवाडीत विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा पाया मजबूत केला जातो. मात्र, त्या विद्यार्थ्यांना शिकवणाऱ्या शिक्षिका आणि मदतनिसांना तुटपुंजे मानधन दिले जात आहे. त्यांना दिवाळीत बोनसही दिला जात नाही. महागाईमुळे बालवाडीमधील शिक्षिका आणि मदतनिसांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागते. पालिकेच्या बालवाडीमधील शिक्षिका आणि मदतनिसांना योग्य मानधन मिळावे यासाठी रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली व कामगार नेते रमेश जाधव यांच्या नेतृत्वाखाली वेळोवेळी आंदोलने, निदर्शने करण्यात आली आहेत. सतत केलेल्या पाठपुराव्यामुळे पालिका आयुक्तांनी बालवाडी शिक्षिका आणि मदतनीस यांचे मानधन दुप्पट करण्यास होकार दर्शवला आहे. मानधन दुप्पट करण्यास स्थायी समितीची मंजुरी आवश्यक असल्याचे आयुक्तांनी सांगितले. त्या अनुषंगाने स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांची बालवाडी शिक्षिका आणि मदतनीस यांच्या उपस्थितीत भेट घेऊन मानधन दुप्पट करण्याची मागणी मंजूर करावी, अशी मागणी करण्यात आली.
त्यावर स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी प्रस्ताव आल्यावर त्वरित मानधन दुप्पट करण्याचा निर्णय घेऊ, असे आश्वासन दिल्याचे रमेश जाधव यांनी सांगितले. मुंबई महापालिकेच्या एकूण 898 बालवाड्या आहेत. या बालवाड्यांमध्ये 898 शिक्षिका व तितक्याच मदतनीस काम करतात. या शिक्षिकांना 5 हजार तर मदतनिसांना 3 हजार मानधन दिले जायचे. त्याऐवजी शिक्षिकांना 10 हजार तर मदतनिसांना 7 हजार मानधन तसेच दिवाळीनिमित्त बोनस दिला जावा, अशी मागणी केली जात होती. त्यापैकी पालिकेकडून शिक्षिकांना 10 हजार तर मदतनिसांना 7 हजार मानधन देण्यास आयुक्तांनी मंजुरी दिली आहे. त्यामुळे स्थायी समितीच्या मंजुरीनंतर 898 बालवाड्यांमध्ये काम करणाऱ्या शिक्षिका आणि मदतनिसांना दिलासा मिळणार आहे.
हेही वाचा -
दमदार अॅक्शनसह 'सूर्यवंशी', 'सिंबा' आणि 'सिंघम'ची धमाकेदार एन्ट्री, पाहा ट्रेलर
दहावीच्या परीक्षेला 3 मार्चपासून सुरुवात; 'गैरमार्गाशी लढा' पथके तयार