मुंबई - कोरोना विषाणूने मुंबईला हॉटस्पॉट बनवले आहे. कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करणाऱ्या आरोग्य, शहरात स्वच्छता राखणाऱ्या सफाई कामगारांसह मुंबई महापालिकेच्या तब्बल ५ हजाराहून अधिक कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. तर कोरोनामुळे २७५ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये आरोग्य कर्मचारी, चतुर्थ श्रेणी व सफाई कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. मृत पालिका कर्मचाऱ्यांना ५० लाख रुपयांची आर्थिक मदत करण्याचे आश्वासन पालिका आयुक्तांनी पूर्ण केले नसल्याने कर्मचारी आणि कामगार संघटनांनी नाराजी व्यक्त केली आहे.
कोरोनाचा प्रसार -
मुंबईत मार्चपासून कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाला. २३ मार्चपासून देशभरात लॉकडाऊन घोषित करण्यात आला. देशभरात लॉकडाऊन सुरू असताना मुंबईत रोज कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत होते. या रुग्णांवर उपचार करण्याचे काम पालिकेच्या आरोग्य विभागातील डॉक्टर, नर्स आदी कर्मचाऱ्यांकडून केले जात आहे. मुंबईत स्वच्छता ठेवण्याचे काम पालिकेचे सफाई कर्मचारी करत आहेत. तर मुंबईकरांना पाणीपुरवठा करण्याचे काम पालिका कर्मचाऱ्यांकडून केले जात आहे. लॉकडाऊन सुरू असताना रस्त्यावर राहणारे नागरिक, हातावर पोट असलेले कामगार, कोरोना झालेले रुग्ण, रुग्णांच्या संपर्कात असलेले संशयित रुग्ण आदींना रोज जेवणाची पाकीट पोहोचवण्याचे काम पालिका कर्मचारी अधिकारी करत आहेत. रुग्ण आढळून आला त्या ठिकाणी औषध फवारणीचे कामही पालिका कर्मचारी करत आहेत.
या कामादरम्यान रुग्णाच्या संपर्कात आल्याने, रुग्ण असलेल्या ठिकाणी गेल्याने पालिकेच्या ५ हजाराहून अधिक कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी ४ हजार २७६ कर्मचाऱ्यांनी कोरोनावर मात केली आहे. तर २७५ कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. पालिकेचे उपायुक्त शिरीष दिक्षित आणि सहाय्यक आयुक्त अशोक खैरनार यांचाही कोरोनाची लागण झाल्याने मृत्यू झाला आहे. मृत कर्मचाऱ्यांच्या वारसाला ५० लाख रुपये आणि अनुकंपा तत्वावर नोकरी दिली जाणार असल्याची घोषणा पालिका आयुक्तांकडून करण्यात आली होती. मात्र केंद्र सरकारकडे पाठवण्यात आलेल्या प्रकरणांपैकी १३ कर्मचाऱ्यांनाच ही मदत देण्यात आली. त्यामुळे पालिका कर्मचारी आणि कामगार संघटनांमध्ये नाराजी पसरली आहे.
केंद्र सरकारने दावे नाकारले -
आतापर्यंत पालिकेच्या २७५ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. मृत कर्मचाऱ्यांचे दावे केंद्र सरकारकडे पाठवले होते. त्यापैकी १३ जणांना केंद्राच्या माध्यमातून मदत देण्यात आली आहे. इतरांचे दावे फेटाळण्यात आले आहेत. इतर मृत कर्मचाऱ्यांना केंद्रीय विमा योजनेत सामावून घ्यावे, अशी मागणी करणारे पत्र केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला पालिकेने लिहिले आहे.
पालिका ५० लाख देणार -
दरम्यान कोरोनाशी लढा देताना कोणत्याही पालिका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबीयांना ५० लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाईल तसेच एका वारसाला अनुकंपा तत्वावर नोकरी दिली जाईल, असे आश्वासन पालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी कामगार संघटनांच्या नेत्यांसोबत झालेल्या बैठकीत दिले होते. ५० कर्मचार्यांच्या कुटुंबांना प्रत्येकी ५० लाखांची मदत देण्यात आली आहे. तर १७ जणांना पालिकेची नोकरी देण्यात आली आहे. यावर आता केंद्र सरकार देत नाही असे बोलून चालणार नाही. पालिका आयुक्तांनी दिलेला शब्द पाळावा असे आवाहन पालिका कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस ऍड. प्रकाश देवदास यांनी केले आहे.
हेही वाचा - राज्यात 3 हजार 160 नव्या कोरोनाग्रस्तांची वाढ, 29 रुग्णांचा मृत्यू