मुंबई - 'क्रिकेटचा देव' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने क्रिकेट विश्वात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. यासाठी त्याचा मुंबई महानगरपालिकेकडून जाहीर नागरी सत्कार केला जाणार होता. तसा प्रस्ताव दहा वर्षांपूर्वीच पालिका सभागृहात मंजूर करण्यात आला. मात्र गेल्या दहा वर्षात सचिन तेंडुलकरने सत्कारासाठी वेळ कळवली नसल्याने अखेर पालिका प्रशासनाने सचिनचा सत्कार करण्याचा प्रस्ताव गुंडाळण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने माहिती दिली.
ठराव आणि मंजुरी..
सचिन तेंडुलकर याने आपल्या २० वर्षांच्या क्रिकेट कारकिर्दीमध्ये कसोटी प्रकारच्या सामन्यांमध्ये ५१ शतके व एकदिवसीय सामन्यांमध्ये ४९ शतके ठोकली आहेत. तसेच, सचिनने क्रिकेटविश्वाला दिलेले योगदान हे अतुलनीय आहे. यामुळे जानेवारी २०१० मध्ये तत्कालिन विरोधी पक्षनेते राजहंस सिंह यांनी मुंबई महापालिकेच्या वतीने सचिनचा नागरी सत्कार करण्याचा ठराव महापालिकेत मांडला होता. हा ठराव तत्कालीन महापौर श्रद्धा जाधव यांनी मंजूर केला होता. सभागृहातील ठरावानंतर फेब्रुवारी २०१० मध्ये तेंडुलकरला ठरावानुसार कल्पना देण्यात आली, आणि त्यांना वेळ देण्याची विनंती महापौर व आयुक्तांच्या कार्यालयामार्फत करण्यात आली. सचिनने ठरावाचे पत्र मिळाल्याचे पालिकेला पत्राद्वारे कळवले. मात्र त्यात सत्कारासाठी सचिनने सत्कारासाठी दिनांक आणि वेळ नमुद केलेली नव्हती. त्यानंतर ११ डिसेंबर २०११ रोजी सचिनला पुन्हा जाहीर नागरी सत्काराबाबत कळवण्यात आले. परंतु, सचिनने महापालिकेला कोणताही प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे हा सत्कार सोहळा पुढे ढकलण्यात आला. गेल्या १० वर्षात सचिनने सत्कारासाठी वेळ दिला नसल्याने अखेर हा नागरी सत्कार रद्द करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाकडून घेण्यात आला.
सचिनचा या पुरस्कारांनी झालाय गौरव..
सचिन तेंडुलकर याने आपल्या २० वर्षांच्या कारकिर्दीमध्ये कसोटीमध्ये ५१ शतके आणि एकदिवसीय सामन्यात ४९ शतके ठोकत शतकांचे शतक साजरे केले होते. तसेच अष्टपैलू खेळ करून जगभरात अनेक विक्रम नोंदवले. सचिनने भारताचे कर्णधारपदही भूषवले आहे. भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान 'भारतरत्न', राजीव गांधी खेलरत्न, पद्मश्री, पद्मविभूषण, अर्जुन, महाराष्ट्र भूषण आदी राज्यस्तरावरील आणि राष्ट्रीय पुरस्कारांनी त्याला सन्मानित करण्यात आली आहे.
सत्कार नाकारण्याबाबात चर्चा..
सचिन तेंडुलकर याने नोव्हेंबर २००९ मध्ये 'मी मराठी असल्याचा मला अभिमान आहे. पण मी प्रथम भारतीय असून मुंबई ही साऱ्या भारताची आहे' असे वक्तव्य केले होते. त्यामुळे शिवसेना दुखावली होती. 'तू खेळायचे काम कर, राजकारण करू नकोस' अशा शब्दात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी 'सामना'मधून सचिनला फटकारले होते. मुंबई महापालिकेत गेली पंचवीस वर्षे शिवसेनेची सत्ता आहे. सचिनला कॉंग्रेसने राज्यसभेवर खासदार म्हणून पाठवले होते, आणि सेना-काँग्रेस हे बरीच वर्षे एकमेकांचे राजकीय विरोधक होते. ही सर्व परिस्थिती पाहता सचिन तेंडुलकरने नागरी सत्कारासाठी वेळ देण्याचे टाळले असावे अशी चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.
हेही वाचा : फटाके बंदीचा प्रस्ताव बारगळला? मात्र फटाकेमुक्त दिवाळीसाठी जनतेला आवाहन