मुंबई - ब्रिटनमध्ये कोविडचा नवीन प्रकारचा विषाणू आढळून आला आहे. याचा प्रसार मुंबईमध्ये होऊ नये म्हणून मुंबईत विमानतळावर उतरणाऱ्या सर्व प्रवाशांचे स्क्रीनिंग करून त्यांना क्वारंटाईन केले जाईल. तसेच २३ डिसेंबर ते ५ जानेवारीपर्यंत रात्री ११ ते सकाळी ६ वाजेपर्यंत नाईट कर्फ्यू लावण्यात आला आहॆ, अशी माहिती मुंबई महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी दिली. कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात फेब्रुवारी ते मार्च दरम्यान मुंबईत तब्बल दोन लाख प्रवासी बाहेरच्या देशातून आले होते. त्यांना क्वारंटाईन केले नव्हते. यामुळे मुंबईत मोठ्या प्रमाणात कोरोना पसरला. मागे जी चूक झाली ती चूक पुन्हा होऊ देणार नाही असे पालिका आयुक्तांनी सांगितले.
हेही वाचा - BREAKING : राज्यात उद्यापासून नाईट कर्फ्यू लागू; मुख्यमंत्र्यांचा निर्णय
एक हजार प्रवासी मुंबईत येणार -
ब्रिटनमध्ये नवा व्हायरसचा प्रकार समोर आला आहे. याची दखल घेत केंद्र सरकारने २३ डिमेंबर पासून ब्रिटनमधील एकही विमान भारतात उतरवण्यास बंदी घातली आहे. मात्र त्यापूर्वी ब्रिटनमधून आज उद्या अशा दोन दिवसात पाच विमान येणार आहेत. त्यामधून एक हजार प्रवासी मुंबईत उतरतील. त्यांना पुढील १४ दिवस क्वारनटाईन केले जाईल. त्यासाठी बेस्टच्या बसेसने या प्रवाशांना हॉटेलमध्ये क्वारनटाईनसाठी पाठवण्यात येणार आहे. या प्रवाशांसाठी ताज हॉटेलमध्ये ४१० रुम, ट्रायडंटमध्ये ३०० रुम, मॅरिएटमध्ये ३०० ते ३५० रूम आणि बजेट हॉटेलवाले १००० असे एकूण २ हजार रूम राखीव ठेवण्यात आले आहेत असे आयुक्तांनी सांगितले. विमानतळावरील कर्मचाऱ्यांना पालिकेकडून मोफत पिपीई किट मोफत देण्यात येणार आहे तसेच क्वारंटाईनचा खर्च नियमाप्रमाणे प्रवाशांना करावा लागणार आहे. असेही त्यांनी सांगितले.
प्रवाशांना क्वारंटाईन करणार -
ब्रिटनमधील जो नवीन व्हायरस आहे त्याची लक्षणे एक ते दोन दिवसात समोर येतात. यामुळे मुंबईत जे प्रवासी येणार आहेत त्यांना क्वारंटाईन केल्या नंतर पाच ते सात दिवसांनी त्यांची आरटीपीसीर चाचणी केली जाईल त्यात ते निगेटिव्ह आले तर त्यांना घरी सोडण्यात येईल. जे प्रवासी एअरपोर्टवर येतील आणि त्यांना ताप, खोकला, सर्दी असल्यास त्यांना त्वरित सेव्हन हिल रुग्णालयात दाखल करण्यात येईल. त्यासाठी सेव्हन हिल रुग्णालयात १०० खाटा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. तसेच इतर देशांतून येणाऱ्या प्रवाशांना राज्य सरकारच्या जीटी रुग्णालयातही उपचाराची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ब्रिटन व्यतिरिक्त इतर देशातून येणाऱ्या प्रवाशांना त्याचे गेल्या ७२ तासातील कोरोना चाचणीचे अहवाल निगेटिव्ह आले तरी त्यांना होम क्वारंटाईन केले जाईल असे आयुक्तांनी सांगितले.
म्हणून मुंबईत नाईट कर्फ्यू -
मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या कमी असली तरी रात्रीच्या वेळी पब, बार, रेस्टोरंटमधील गर्दी वाढत आहे. एखाद्या ठिकाणी ५० लोक एकत्र येण्याची मर्यादा असताना मोठ्या प्रमाणात लोक एकत्र येत असल्याचे समोरच्या आले आहे. यासाठी नाईट कर्फ्यू लावण्यात आला आहे. २३ डिसेंबर ते ५ जानेवारी पर्यंत रात्री ११ ते सकाळी ६ वाजेपर्यंत नाईट कर्फ्यू लावण्यात आला आहे. यावेळेत एका ठिकाणी ५ हुन अधिक लोकांना बंदी असेल. एखाद्या ठिकाणी ५ पेक्षा जास्त लोक आढळून आल्यास त्यांच्यावर मुंबई पोलीस आणि मुंबई महापालिकेकडून साथ नियंतर्ण कायद्यानुसार कारवाई केली जाईल असे आयुक्तांनी सांगितले.