मुंबई - भारतातल्या सगळ्यात मोठ्या शहरी परिवहन सेवांपैकी एक मानल्या जाणाऱ्या बेस्ट उपक्रमाच्या बस कर्मचाऱ्यांना थकीत रक्कम देणेही प्रशासनाला कठीण झाले आहे. बेस्ट कर्मचाऱ्यांना ग्रॅजुटीसह अन्य थकित रक्कम देण्यासाठी मुंबई महापालिकेने ४५० कोटींचे अर्थ सहाय्याच्या प्रस्तावाला पालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंग चहल यांनी मंजुरी दिली आहे.यामुळे ३५१६ निवृत्त कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी ग्रॅजुटीसह अन्य थकित रक्कम ( BMC approval to crores rupees to pay gratuity and other outstanding amounts to BEST employees ) मिळणार आहे.
बेस्ट आर्थिक अडचणीत - बेस्ट उपक्रम बसच्या माध्यमातून मुंबईत विद्युत आणि परिवहन सेवा देत आहे. बेस्टमध्ये ४२ हजार कर्मचारी कार्यरत होते. सध्या २९ हजार कर्मचारी कार्यरत आहेत. गेल्या काही वर्षात खर्च आणि बाहेरून घेतलेले कर्ज यामुळे बेस्टची आर्थिक परिस्थिती खराब झाली आहे. बेस्टला आपली देणी देणे अडचणीचे ठरत आहे. यासाठी पालिकेने बेस्टला ५३२१ कोटी रुपयांचे अर्थ सहाय्य केले आहे. पालिकेने आर्थिक सहाय्य केले असले तरी बेस्टची आर्थिक परिस्थिती सुधारलेली नाही.
बेस्ट कर्मचाऱ्यांना पालिकेचा आधार - बेस्ट उपक्रमामधून २०२० ते मार्च २०२२ या कालावधीत ३५१६ कर्मचारी सेवा निवृत्त झाले आहेत. सेवा निवृत्त कर्मचाऱ्यांची देणी देण्यासाठी बेस्ट उपक्रमाने मुंबई महापालिकेकडे ४५० कोटी रुपयांचे अर्थ सहाय्य मागितले होते. त्यानुसार प्रस्तावाला प्रशासकीय अधिकारी म्हणून पालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंग चहल यांनी मंजुरी दिली आहे. पालिकेच्या आर्थिक मदतीमुळे बेस्ट उपक्रमातील सेवा निवृत्त कर्मचाऱ्यांना विविध देणी लवकरच मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
पालिकेची आर्थिक मदत - बेस्ट उपक्रमाची आर्थिक परिस्थिती विचारात घेऊन, सन २०१९-२० पासून ते सन २०२२-२३ (२१ ऑगस्ट २०२२) पर्यंत करण्यात आलेल्या तरतूदींमधून २१४१.०५ कोटी व तरतुदींव्यतिरिक्त अतिरिक्त अनुदान, रक्कम म्हणून २० ऑगस्ट २०२२ पर्यंत ३१८०.२२ कोटी असे एकूण ५३२१.२७ कोटींचे अधिदान बेस्ट उपक्रमास करण्यात आले आहे.
बेस्ट बस सेवा - बेस्ट बस सेवा भारतातल्या सगळ्यात मोठ्या शहरी परिवहन सेवांपैकी एक मानली जाते. मुंबईच्या कुठल्याही भागात जायला बेस्टची सेवा आहे. नवी मुंबई, ठाणे, मीरा-भाईंदर अशा बाजूच्या शहरांमध्येही बेस्टची सेवा आहे. भारतातल्या काही नफ्यामध्ये असणाऱ्या विद्युत मंडळांपैकी एक नाव म्हणजे "बेस्ट" आहे.