मुंबई - मुंबईमधील रस्ते आणि ट्रॅफिक यामुळे रस्ते मार्गाने प्रवास करणारा मुंबईकर नेहमीच त्रस्त असतो. त्यातच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी मुंबईच्या ट्रॅफिकमुळे ३ टक्के घटस्फोट होतात, असा आरोप केला आहे. वास्तविक पाहता मुंबईमधील रस्त्यांवरील खड्डे आणि ट्रॅफिकची समस्या सोडवण्यासाठी पालिकेने याआधीच सुरुवात केली आहे. त्यासाठी मुंबईमधील रस्ते काँक्रिटचे केले जात आहेत. तसेच, मुंबईत जागा मिळेल तेथे वाहने पार्क केल्याने पार्किंगची समस्या निर्माण होते. पार्किंगची समस्या सोडवण्यासाठी मुंबई वाहनतळ प्राधिकरण सुरू केले जात आहे. यासाठी पालिकेच्या २४ विभागांपैकी ३ विभागात पायलट प्रकल्प राबवला जाणार असून एका ॲपच्या माध्यमातून नागरिकांना पार्किग लॉट उपलबध करून दिला जाणार आहे.
हेही वाचा - Hindusthani Bhau : हिंदुस्तानी भाऊच्या अडचणी संपेना; आता 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
रस्ते काँक्रिटीकरणावर भर -
मुंबईत पावसाळा सुरू झाली की, विविध ठिकाणी रस्ते खड्डेमय होतात. दरवर्षी रस्त्यांवर पडणाऱ्या खड्ड्यांमुळे मुंबईकर त्रस्त होतात. मुंबईत मुंबई महापालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग, एमएमआरडीए, मुंबई पोर्ट ट्रस्ट, रेल्वे आदी विभागांचेही रस्ते आहेत. मात्र, खड्डे आणि निकृष्ट रस्ते यावरून महापालिकेवर टीका केली जाते. पालिकेवर होणारी टीका बंद व्हावी म्हणून शहरातील सर्वच रस्ते काँक्रीटचे करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. गेले काही वर्षे टप्प्याटप्याने मुंबईमधील रस्ते काँक्रीटचे केले जात आहेत. ज्या ठिकाणचे रस्ते काँक्रीटचे करणे शक्य नाही, अशा ठिकाणचेच रस्ते डांबराचे केले जात आहेत.
यंदा २२०० कोटींची तरतूद -
मुंबई पालिकेने २०२१ - २२ मध्ये १९६ किमीचे रस्ते पूर्ण केले आहेत. त्यात, सीमेंट काँक्रीटचे रस्ते १६३.५७ किमी असून ३२.७७ किमी रस्त्यांचे डांबरीकरण केले आहे. २०२२ - २३ मध्ये २१९ किमी रस्त्यांचे काम केले जाणार आहे. त्यात, २०६ किमीचे रस्ते सीमेंट काँक्रीटचे असून १२.५३ किमी रस्त्यांचे डांबरीकरण केले जाणार आहे. यंदा २०२२ - २३ वर्षात शहर भागातील एस.व्ही.पी. मार्ग, ई बोर्जेस मार्ग, श्रीकांत हडकर मार्ग, पश्चिम उपनगरातील लल्लूभाई पार्क, लल्लूभाई शामलदास मार्ग, आरे कॉलनी मार्ग, आय.सी. कॉलनी मार्ग आणि पूर्व उपनगरातील वालजी लद्धा मार्ग, लेक मार्ग अशा प्रमुख रस्त्यांची कामे केली जाणार आहेत. त्यासाठी पालिकेने २ हजार २०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे, अशी माहिती पालिकेचे आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी दिली.
पार्किंगसाठी वाहनतळ प्राधिकरण -
मुंबईमध्ये १ हजार १०० किलोमीटरचे रस्ते असून त्यांचे फुटपाथ २ हजार २०० किलोमीटर इतके आहेत. शहरात एकूण ३५ लाख वाहने आहेत. वाहने पार्किंग करण्यासाठी योग्य प्रमाणात जागा नसल्याने मुंबईकर रस्त्यावरच मिळेल त्या ठिकाणी वाहने पार्किंग करतात. यामुळे रस्त्यावरील वाहतुकीवर याचा परिणाम होऊन वाहतूक कोंडी होते. या वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून पालिकेने मुंबई वाहनतळ प्राधिकरणाची स्थापना करण्याचे निश्चित केले आहे. विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली २०३४ मध्ये पार्कींगसाठी विशेष तरतूद करण्यात आली आहे.
मुंबई वाहनतळ प्राधिकरणाचे काम प्रगतीपथावर
वाहतूक क्षेत्रातील खासगी व्यावसायिक, नगर रचनाकार आणि नगर संकल्प डिझाईनर, तज्ज्ञ, धोरण संशोधक, भौगोलिक माहिती प्रणाली (जीआयएस) सर्वेक्षक आदी मनुष्यबळ पुरविण्याकरीता एजन्सीची नियुक्ती केली आहे.
ॲपद्वारे पार्किंग लॉट उपलब्ध होणार -
मुंबईमधील नागरिक १० तास कामानिमित्त आपल्या घराबाहेर असतात. अशावेळी त्यांच्या राहत्या घराखाली पार्किंगमध्ये कोणतीही गाडी पार्क नसते. या कालावधीत हौसिंग सोसायटीबरोबर करार करून अशा जागा पार्किंगसाठी उपलब्ध केल्या जातील. पालिकेचे स्वतःचे पार्किंग तळ आणि सोसायट्यांमधील रिक्त असलेले पार्किंग लॉट याद्वारे सुमारे ५० लाख पार्किंग लॉट उपलब्ध करून दिले जातील. हे सर्व पार्किंग लॉट एका ॲपवर आणून नागरिकांना ज्या विभागात काम आहे त्याच्या जवळचे पार्किंग लॉट उपलब्ध करून दिले जातील. यासाठी मुंबई महापालिकेच्या २४ पैकी ३ विभागांत पायलट प्रकल्प सुरू केला जाणार असल्याची माहिती आयुक्तांनी दिली.
हा जावई शोध कुठून लावला -
मुंबईतील ट्रॅफिक (Divorce Due To Traffic) जामच्या समस्येमुळे 3 टक्के घटस्फोट होतात. त्यामुळे, सामान्य नागरिकांप्रमाणे हे सर्व मुद्दे मांडण्याचा प्रयत्न आपण करत असल्याचे वक्तव्य अमृता फडणवीस ( Amruta Fadnavis) यांनी केले होते. त्यावरून मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी अमृता फडणवीस (Kishori Pednekar Critisized Amruta Fadnavis) यांच्यावर टीका केली आहे. त्यांनी हा जावईशोध कुठून लावला, असे त्या म्हणाल्या. ज्याचे त्याचे क्षेत्र आहे, त्याने त्या क्षेत्रात काम करावे. आम्ही त्यांना कुठल्या भूमिकेत बघायचे? सामान्य स्त्री की माजी मुख्यमंत्र्यांच्या पत्नी म्हणून बघायचे? असे प्रश्न पेडणेकर यांनी विचारले. तसेच, असा जावईशोध करून मुंबई किंवा महाराष्ट्राला मलिन करण्याचा प्रयत्न करू नये. 2019 ला जे राजकीय बदल झाले त्यावरून मला वाटते आधी भाजपाचे पुरुषच हैराण होते. पण, आता घरच्या महिलादेखील हैराण झाल्या आहेत, असेही त्या म्हणाल्या. तसेच, त्यांनी सामान्य महिला म्हणून केंद्रातील विषयांवरही बोलावे, असा टोलाही त्यांनी लगावला. वक्तव्य केले ते चुकीचे आहे. ही वृत्ती महाराष्ट्राला अधोगतीला नेते असे महापौर म्हणाल्या.