मुंबई - मुंबईबाबत वादग्रस्त विधान करणारी सिनेअभिनेत्री कंगना रणौत अडचणीत आली आहे. कंगनाच्या पाली हिल येथील "मणिकर्णिका" कार्यालयाची पालिका अधिकाऱ्यांनी तपासणी केल्यानंतर रहिवासी घरातच व्यावसायिक कार्यालय बनवल्याचे समोर आले आहे.
कंगनाच्या या कार्यालयात तसेच त्यात मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर बांधकाम केल्याचे समोर आले आहे. यामुळे पालिकेने तिला बेकायदेशीर बांधकाम केल्या प्रकरणी मंगळवारी 354 कलमान्वये नोटीस बजावली होती. या नोटीसला कंगनाने 24 तासांत उत्तर दिले नसल्याने नोटीसचा कालावधी संपला आहे. यामुळे पालिकेने तोडक कारवाई सुरू केली आहे. याविरोधात कंगनाने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
कंगना रणौतने मुंबईची तुलना पाक व्याप्त काश्मीरशी केली होती. तसेच, मी मुंबईत येत आहे कोणाच्या बापात दम असेल तर, मला रोखून दाखवावे असे वक्तव्य केले होते. यामुळे मुंबई महापालिकेवर गेल्या 25 वर्षाहून अधिक काळ सत्ता असलेल्या शिवसेनेने कंगनाला विरोध केला आहे. शिवसेना आणि कंगना यांच्यामधील वाद रंगला असतानाच सोमवारी कंगणाच्या वांद्रे पाली हिल येथील "मणिकर्णिका" कार्यालयाची पाहणी पालिका अधिकाऱ्यांकडून करण्यात आली. कार्यालयाचे मोजमाप घेऊन बेकायदेशीर बांधकाम झाले आहे का? याचीही तपासणी करण्यात आली.
या दरम्यान कंगनाने आपल्या कार्यालयात पालिका अधिकाऱ्यांनी जबरदस्तीने घुसून मोजमाप घेतले. पालिका माझे कार्यालय तोडणार आहे, असे ट्विट कंगनाने केले होते. त्यानंतर मंगळवारी पालिकेने कंगनाला बेकायदेशीर बांधकाम केल्याप्रकरणी 354 कलमान्वये नोटीस बजावली आहे. कंगना उपस्थित नसल्याने ही नोटीस तिच्या कार्यालयाबाहेर लावण्यात आली होती. कंगनाने याबाबत 24 तासात कोणतेही उत्तर दिलेले नाही. यामुळे पालिकेने पालिकेने तोडक कारवाईला सुरुवात केली आहे.
कंगनाने काय केले बेकायदेशीर बांधकाम -
१) ग्राऊंड फ्लोअरवरील टॉयलेटला ऑफिस केबिनमध्ये रूपांतरित केले आहे
२) स्टोअर रूमचे किचन रूममध्ये रूपांतर
3) ग्राऊंड फ्लोअरवर पायऱ्यांवर अनधिकृत टॉयलेट
4) तळ मजल्यावर अनधिकृत किचन तयार
5) देवघर आणि लिव्हिंग रूममध्ये अनधिकृत केबिन आणि लाकडी पार्टिशन
6) पहिल्या मजल्यावर अनधिकृत शौचालय
7) समोरील बाजूस अनधिकृत स्लॅबची निर्मिती
8) दुसऱ्या मजल्यावर अनधिकृत जिना निर्मिती
9) दुसऱ्या मजल्यावर अनधिकृत बाल्कनीची निर्मिती