पुणे - राज्यात महिलांवरच्या अत्याचारात वाढ झाली आहे. राज्य सरकार महिलांचे प्रश्न हाताळण्यात कमी पडत असल्याचा आरोप भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी केला आहे. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात आम्ही कोर्टात पीआयएल दाखल केली आहे. राठोड यांचा राजीनामा एवढाच आमचा उद्देश नव्हता आम्ही हे प्रकरण पूर्ण तडीस नेणार आहोत, असे चित्रा वाघ म्हणाल्या महिलांवरील अत्याचाराच्या प्रश्नावर भूमिका मांडण्यासाठी चित्रा वाघ यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेतली त्यावेळी त्या बोलत होत्या.
राज्यात क्राईम रेट वाढला -
चित्रा वाघ म्हणाल्या, राज्यात क्राईम रेट कमी झाला असल्याच राज्याचे गृहमंत्री सांगत आहेत, मात्र परिस्थिती वेगळी असून राज्यातले वास्तव काही वेगळेच सांगत आहे. चित्रा वाघ यांनी कॉंग्रेस प्रवक्ते राजीव वाघमारे यांच्या भावावरती बलात्काराचा गुन्हा दाखल झाला असल्याची माहिती देत एकंदरीतच राज्यातल्या सध्याच्या परिस्थितीवर भाष्य केले. कोविड सेंटरमध्ये महिला रुग्णाच्या विनयभंगाचा मुद्दा उपस्थितीत करत राज्यात 14 विनयभंगाच्या घटना आणि दोन बलात्काराच्या घटना होऊन देखील प्रशासनाने दखल घेतली नाही.
हे ही वाचा - मराठा आरक्षण : मुख्यमंत्र्यांनी बोलाविली मराठा नेत्यांची बैठक
अधिकाऱ्यांना पाठिशी घातले जातंय -
यावेळी चित्रा वाघ यांनी लातूर जिल्ह्यातल्या एका मुलीला सामाजिक न्याय खात्यात वडिलांच्या जागेवर अनुकंपा भरती करण्यासाठी या खात्यातील अधिकाऱ्याने शरीरसुखाची मागणी केली, असे चित्रा वाघ यांनी सांगत या मुलीने सामाजिक खात्याच्या सचिवांकडे तक्रार केली. अद्याप या अधिकाऱ्यावर कारवाई झालेली नाही असे चित्रा वाघ म्हणाल्या. उलट शासकीय कामात अडथळा आणला म्हणून या मुलीच्या आईवरच गुन्हा दाखल केला जातो. पीडित मुलीने व्हिडिओ बनवून न्यायाची मागणी केली आहे. त्या मुलीच्या आवाजातील ऑडिओ क्लिप चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषदेमध्ये ऐकवली. या प्रकरणाचा आधार घेत चित्रा वाघ यांनी धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला. सामाजिक न्याय खात्याच्या मंत्र्यांचा कित्ता सामाजिक न्याय विभागात गिरवला जातोय, यामुळे या अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी करून देखील त्यांना पाठीशी घातले जात असल्याचा आरोप चित्रा वाघ यांनी केला.
हे ही वाचा - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते स्वातंत्र्याच्या 'अमृत महोत्सवाचे' उद्घाटन