मुंबई - विधान परिषद निवडणूक प्रकरणी केंद्रीय यंत्रणा आमदारांना फोन करत असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला होता. त्यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पलटवार केला आहे. सत्ताधारी हारण्याची कारणे शोधत असून त्याची तयारी आतापासूनच सुरू झाली आहे. नाना पटोले यांनी केलेला आरोपही त्यातीलच असल्याची टीका चंद्रकांत पाटील यांनी केली. नाना पटोले यांची ही बोगस स्क्रिप्ट असल्याची खिल्लीही चंद्रकांत पाटील यांनी उडवली.
महाविकास आघाडी सरकारला त्यांचे आमदार देणार धक्का - विधानपरिषद निवडणुकीसाठी आमदारांना केंद्रीय यंत्रणांकडून थेट फोन जात असून दबाव आणला जात असल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. या संदर्भात आपल्याकडे माहिती असून आपण ती योग्य वेळी पुढे आणू असा इशाराही पटोले यांनी दिला. पटोले यांच्या या वक्तव्याचा समाचार घेताना पराभव आता नजरेच्या टप्प्यात दिसू लागल्याने नाना पटोले बोगस स्क्रीप्ट तयार करत असल्याचा आरोप भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. या निवडणुकीत भाजपचे सर्व उमेदवार विजयी होतील, असा दावाही चंद्रकांत पाटील यांनी केला. महाविकास आघाडी सरकारला त्यांचेच आमदार धक्का देतील, असेही पाटील यांनी यावेळी सांगितले.
हिंसाचार राजकीय हेतुने, तरुणांच्या करिअरचे नुकसान - लष्करात जाऊन देशाची सेवा करू इच्छिणारा तरूण कधीही देशाच्या संपत्तीचे नुकसान करू शकत नाही. अग्निपथ योजनेच्या विरोधात चाललेला हिंसाचार हा राजकीय हेतूने आहे. त्यातून गुन्हे दाखल झाल्यामुळे संबंधित तरुणांना कोणतीही नोकरी मिळणे अशक्य होईल. त्यामुळे त्यांचे करिअरचे कायमस्वरुपी नुकसान होईल, असेही चंद्रकांत पाटील यावेळी म्हणाले.
तरुणांनी विचार करावा - राजकीय हेतुने अग्निपथच्या विरोधात हिंसाचाराला चिथावणी देण्यात येत आहे. या हिंसाचारात भाग घेणाऱ्या तरुणांच्या विरोधात गुन्हे दाखल होतील. नंतर त्यांना लष्करात, सरकारमध्ये किंवा खासगी क्षेत्रातही नोकरी मिळणार नाही. त्यांचे आयुष्यभराचे नुकसान होईल. हिंसाचार केल्यामुळे आपले करिअरचे काय नुकसान होईल, याचा तरुणांनी विचार करावा असे आवाहनही त्यांनी सांगितले.