मुंबई - एल्गार परिषदेत शरजिल उस्मानी याने हिंदू समाजाबाबत केलेल्या विधानामुळे वादाला तोंड फुटले आहे. तसेच उस्मानी याच्यावर कारवाईसाठी विरोधी पक्ष भाजपाने आक्रमक भूमिका घेतली होती. दरम्यान, शरजिल उस्मानी हा पुण्यात येऊन गुपचूप जबाब नोंदवून निघून गेल्याचे समोर आल्यानंतर भाजपाने राज्यातील सत्ताधारी ठाकरे सरकारवर पुन्हा एकदा घणाघाती टीका केली आहे. शरजील उस्मानी हा ठाकरे सरकारचा जावई आहे का? आणि हे राज्यातील आघाडी सरकार गुन्हेगारांना संरक्षण देण्याचं काम करत आहे का? असा सवाल भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी पत्रकार परिषदेत विचारला.
हे सरकार आरोपींना पाठीशी घालण्याचं काम करत आहे-
शरजिल उस्मानीच्या मुद्द्यावरून ठाकरे सरकारला लक्ष्य करताना केशव उपाध्ये म्हणाले की, शरजिल उस्मानी हा ठाकरे सरकारचा जावई आहे. हे काल पुन्हा सिद्ध झाले. हे सरकार आरोपींना पाठीशी घालण्याचं काम करत आहे, हे सचिन वझे यांच्या प्रकरणात सुद्धा दिसून येत आहे. एल्गार परिषदेत केलेल्या हिंदूविरोधी वक्तव्याबाबत पोलिसांकडे जबाब नोंदवण्यासाठी तो पुण्यात आला आणि गुपचूप निघून गेला. सरकारने इतकी गोपनीयता पाळली की, या कानाचे त्या कानाला कळले नाही. शरजिल उस्मानीवर कोणतीच कलम टाकली नाही. त्यामुळे हे सरकार त्याला पाठीशी घालण्याचं काम करत आहे.
शरजिलवर स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल-
पुण्यात गणेश कला क्रीडा रंगमंच येथे झालेल्या एल्गार परिषदेत हिंदू धर्माविषयी आक्षेपार्ह भाषण केल्याप्रकरणी भाजपने याच विषयावर आंदोलन करून उस्मानीच्या अटकेची मागणी केली होती. याबाबत भारतीय युवा जनता मोर्चाचे सचिव प्रदीप गावडे यांनी तक्रार दिली आहे. हिंदू धर्माच्या भावना भडकावल्याप्रकरणी (भादंवि कलम १५३ ए) शरजिलवर स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात होता.
हेही वाचा- मनसुख हिरेन प्रकरणाचे धागेदोरे 'मातोश्री'वर; खासदार नवनीत राणांचा मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप