मुंबई - मनी लॉन्डिरिंग प्रकरणात ईडीने अटक केलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधक लावून धरत आहेत. या प्रसंगी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा जो ठाकरी बाणा होता तो ठाकरी बाणा आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दाखवतील का? असा प्रश्न भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी उपस्थित केला आहे. भाजप प्रदेश कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
मुख्यमंत्र्यांनी ठाकरी बाणा दाखवावा
१९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटातील मुख्य आरोपी दाऊद इब्राहिम याच्या बहिणीबरोबर जमिनीचे व्यवहार केल्या प्रकरणी ईडीने राष्ट्रवादीचे नेते अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना काल अटक केल्यानंतर राजकीय वातावरण मोठ्या प्रमाणात तापलेले आहे. नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधक जोर लावून करत आहेत, परंतु सत्ताधारी तसेच राष्ट्रवादी काँग्रेस प्रमुख शरद पवारही नवाब मलिक यांचा राजीनामा घेण्याच्या तयारीत नाहीत. यासाठी अशा प्रसंगी 1993 च्या बॉम्ब ब्लास्ट नंतर ज्या पद्धतीने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ठाकरी बाणा दाखवला होता व त्यासाठी ते प्रसिद्ध आहेत, अशा पद्धतीचा ठाकरी बाणा आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दाखवाव व नवाब मलिक यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी उपाध्ये यांनी केली.
विशिष्ट समुदायाच्या लोकांना नाराज न करण्यासाठी राजीनामा घेतला जात नाही
नवाब मलिक यांचा राजीनामा घेण्यात अडचण काय आहे? माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा तात्काळ घेण्यात आला. नवाब मलिक यांचा राजीनामा का घेतला जात नाही? नवाब मलिक हे मलिक असल्याकारणाने विशिष्ट समुदायाच्या लोकांना नाराज न करण्यासाठी अशा पद्धतीचा वागणे बरोबर नाही. निवडणुका नजरेसमोर ठेवून हे सर्व केले जात आहे का? असा आरोपही केशव उपाध्ये यांनी केला आहे.
जी व्यक्ती देशाशी देशद्रोह करणाऱ्या दाऊद इब्राहिमच्या कुटुंबाशी व त्यांच्याशी आर्थिक व्यवहार करते ती नक्कीच देशद्रोहासाठी पात्र आहे, असेही केशव उपाध्ये म्हणाले. आज महाविकास आघाडी तर्फे करण्यात आलेल्या आंदोलनामध्ये शिवसेनेच्या नेत्यांनी अंगात भगवे वस्त्र परिधान केले होते. त्यावरून सुद्धा केशव उपाध्ये यांनी शिवसेनेला डिवचले आहे. शिवसेना हिंदुत्व कधीच विसरली आहे. परंतु, देशद्रोहाशी संबंध ठेवणाऱ्या व्यक्तीसाठीसुद्धा शिवसेना भगवे वस्त्र परिधान करते हे कितपत योग्य आहे? असा सवालही केशव उपाध्या यांनी उपस्थित केला.