मुंबई - अजित पवार यांना भाजपकडून अडीच वर्ष मुख्यमंत्रीपदाची ऑफर असल्याचा गौप्यस्फोट संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. तसेच सत्ता नसेल तर भाजपचे नेते वेडे होतील. सत्तेचा ते कायमच गैरवापर करत आल्याचे राऊत यांनी यावेळी सांगितले. राज्यात सत्तास्थापनेचा पेच अजूनही कायम आहे. त्यावरही संजय राऊत यांनी भाष्य केले आहे.
हेही वाचा - अजित पवारांचे बंड फसले, भ्रमाचा भोपळा फुटला; 'सामना'तून 'बाण'
अजित पवारांसोबत दोनच आमदार आहेत. दौलत दरोडा, अनिल पाटील या आमदारांना भाजपने गुडगावच्या हाॅटेलमध्ये कोंडून ठेवले होते. भाजप सत्तेचा गैरवापर करत आहे. तसेच अजित पवारांना भाजपकडून मुख्यमंत्रीपदाची ऑफर असल्याचे संजय राऊत यांनी यावेळी सांगितले. भाजपने सत्तेचा गैरवापर केला असून आता आम्ही भाजपला पुरून उरू असे राऊत म्हणाले.
विश्वासदर्शक ठरावावेळी भाजपपेक्षा 10 सदस्य आमचे जास्त असतील. बहुमत नसतानाही फडणवीस, अजित पवारांनी शपथ घेतली हे गैर आहे. तसेच अजित पवारांना राष्ट्रवादीचे नेते मनवण्याचा प्रयत्न करत आहेत, असे संजय राऊत यांना विचारले असता, आम्हीसुद्धा राज ठाकरेंची मनधरणी करण्यासाठी वेळोवेळी त्यांना भेटत होतो, असे संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.