मुंबई - महापौर, गटनेते आणि अध्यक्ष तसेच वैधानिक समित्यांच्या होणाऱ्या सभा झूम अॅपद्वारे घेण्याचा निर्णय महापौरांनी घेतला आहे. त्यानुसार मंगळवारी एक बैठक बोलावण्यात आली. तथापि, भाजपा गटनेते प्रभाकर शिंदे यांनी चिनी अॅपद्वारे होणाऱ्या या बैठकीला आक्षेप घेतला आहे. ही बैठक रद्द करावी, अन्यथा भाजपातर्फे बैठकीवर बहिष्कार घालण्यात येईल, असा इशारा दिला आहे.
मंगळवारी पालिका कामकाजासह इतर समित्यांच्या कामकाजावर विचार करण्याकरिता महापौरांनी, गटनेते आणि अध्यक्ष तसेच वैधानिक समित्यांच्या सभा या झूमॲपद्वारे घेण्याचे निश्चित केले आहे. सर्व गटनेत्यांसाठी पत्रक काढत सभेत वेळेवर सहभागी व्हावे, अशी विनंती मुंबई महापौरांनी केली होती. त्यावर भाजपा गटनेते प्रभाकर शिंदे यांनी आक्षेप घेत महापौरांनी झूम ॲपद्वारे घेतलेली बैठक रद्द करावी, असे पत्र लिहिले आहे.
भाजपा गटनेते शिंदे यांनी महापौरांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, महापालिकेत बैठकीसाठी मूळ चिनी मालक असलेल्या अमेरिकन कंपनीच्या व सर्वात महत्त्वपूर्ण म्हणजे चीनमधून नियंत्रित होणाऱ्या ' झूम अॅपचा वापर अनाकलनीय आहे. त्यामुळे मी पत्राद्वारे आपणास विनंती करतो की, झूम अॅप'द्वारे आयोजित केलेली बैठक रद्द करावी. यापूर्वी अनेक बैठका रद्द करण्यात आल्या असल्यामुळे सदर बैठक रद्द न करता प्रत्यक्ष घेण्यात यावी, अन्यथा भाजपतर्फे 'झूम' बैठकीवर बहिष्कार टाकण्यात येईल, असा इशारा पत्रात दिला आहे.
देशभर चिनी मालावर तसेच ॲप्सवर बहिष्कार टाकण्यात येत असताना, मुंबई पालिकेत चिनी ॲपद्वारे सभा बैठका घेत काय साध्य करत आहात? असा प्रश्न मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना भाजपा गटनेते प्रभाकर शिंदे यांनी विचारला आहे. यावर आता गटनेत्यांची महापौरांनी झूम ॲपद्वारे घेतलेली बैठक रद्द होते का? किंवा आणखी कोणत्या ॲपद्वारे ही बैठक होते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.