मुंबई - कोरोना-टाळेबंदीचा फटका सर्वसामान्यांना बसल्याने अनेकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे. असे असताना दुसरीकडे मात्र राजकारणी कोट्यवधींचा आशियाना खरेदी करताना दिसत आहेत. विदर्भातील भाजपा आमदाराने मुंबईतील वरळीसारख्या गजबजलेल्या ठिकाणी तब्बल 42.5 कोटींचा फ्लॅट घेतला आहे.
वरळीत 42.5 कोटींचा महागडा फ्लॅट घेणाऱ्या भाजपा आमदाराचे नाव आहे कीर्तीकुमार मितेश भंगाडिया. चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर मतदारसंघाचे ते आमदार आहेत. तर, त्यांचे वडील मितेश भंगाडिया हे माजी आमदार आहेत. कीर्तीकुमार हे विदर्भातील श्रीमंत आमदार म्हणून ओळखले जातात.

येथे खरेदी केला आहे फ्लॅट
2017-18 मध्ये वरळीतील एका टॉवरमधील 26व्या मजल्यावर 7 हजार 530 चौरस फुटाचा फ्लॅट कीर्तीकुमार भंगाडीया यांनी खरेदी केला आहे. तर, 29 सप्टेंबरला या घराची नोंदणी करत मुद्रांक शुल्क भरले आहे. फ्लॅटबरोबर त्यांनी कार पार्किंगची जागाही खरेदी केली आहे.
आमदारांनी ही दिली प्रतिक्रिया-
कीर्तीकुमार भंगाडिया यांनी म्हटले की, माझा सांताक्रुझला फ्लॅट आहे. पण आमचे एकत्रित कुटुंब आहे. त्यामुळे एक मोठे घर मुंबईत हवे होते. त्यामुळे दोन-तीन वर्षांपूर्वीच या घराच्या खरेदीची प्रक्रिया सुरू होती. नोंदणी पूर्ण झाल्याने खरेदीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. आमच्या मोठ्या हक्काच्या घराचे स्वप्न आता पूर्ण झाले आहे. मी, माझा भाऊ आणि वडील अशा सर्वांनी मिळून हा फ्लॅट घेतल्याचेही त्यांनी सांगितले.