मुंबई - रिपब्लिक टीव्ही' चॅनेलचे संपादक अर्णब गोस्वामी यांना अलिबाग पोलिसांनी अन्वय नाईक प्रकरणात अटक केली आहे. सूडबुद्धीने केलेली ही कारवाई आहे. या कारवाईचा जाहीर निषेध भाजप नेते आशिष शेलार यांनी केला आहे. जसे नाईक यांचे प्रकरण उघडले तसे आता परमार आणि इतरांच्या पेंडिंग केसेस उघडाव्या, ज्यांची नावं आहेत त्यांनाही पोलीस व महाराष्ट्र सरकार अटक करेल का? असा प्रश्न शेलार यांनी उपस्थित केला आहे.
आशिष शेलार यांची राज्य सरकारवर टीका -
आशिष शेलार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, 1974 मध्ये काँग्रेसने लादलेल्या आणीबाणीचे समर्थक होते. शिवसेना ही आज समर्थक नसून व्यवस्थापक झाले आहेत. नाईक परिवाराला न्याय हा काल ही मिळाला पाहिजे होता, आजही मिळाला पाहिजे असे आमचे मत आहे. पण, चालु असलेले चक्र स्पष्ट करत आहे की गेल्या काही दिवसांपासून चालू असलेल्या गोष्टी झाल्या. त्यामुळे ही कारवाई केली आहे.
पुढे शेलार म्हणाले की, सरकारविरोधात कारवाई दाखवेल त्यांच्यावर कारवाई केली जाते. महाराष्ट्र सरकारला जे प्रश्न विचारतील त्यांच्यावरही कारवाई केली जात आहे. असे काही दिवसांपासून स्पष्ट होत आहे.
सोनिया गांधींचे आदेश उद्धव ठाकरे पाळतात - शेलार
हिंदूंवर आणि देशरक्षण यावर कोण बोलेल तर त्यावर आम्ही कारवाई करु, असे संकेत हे सरकार नेहमी देत आहे. राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांनी आदेश दिला आणि उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी हा आदेश पाळला असा यांचा कार्यक्रम आहे. बंद झालेल्या केसेस, जर उघडत असतील तर अशा अनेक केस या लोकांनी ओपन केल्या तर यांना पळता भुई थोडी होईल. दिल्लीत बसलेले युवराज यांच्या आदेशानुसार या कारवाई होत असल्याचे शेलार म्हणाले.
पुढे बोलताना शेलार म्हणाले, बाळासाहेब असते तर असे झाले नसते. उद्धव आणि आदित्य ठाकरे यांची सेना ही सोनिया सेना झाली आहे असे आमचे मत आहे. दिल्लीत असलेले सोनिया गांधी व राहुल गांधी एक राजमाता आणि युवराज आहेत. आजच्या कारवाईबाबत हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. उद्धवसेना ही सोनियासेना झाली आहे, असे म्हणत आशिष शेलार यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे.