मुंबई - शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिल्लीत पत्रकारांशी बोलताना महिलांबद्दल आक्षेपार्ह विधान केले होते. या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा नोंद करावा, अशी मागणी भाजप महिला मोर्चातर्फे करण्यात आली आहे. भाजप नगरसेविका शीतल गंभीर देसाई यांनी याबाबत मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात तसे पत्र दिले आहे.
आशिष शेलार यांच्यावर गुन्हा दाखल होतो, संजय राऊतांवर का नाही?
मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी भाजप नेते आमदार आशिष शेलार यांच्यावर मुंबईतील मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणात आशिष शेलार यांना जामीन मंजूर झाला आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी देखील दिल्लीत बोलताना महिलांबद्दल आक्षेपार्ह विधान केले आहे. त्याबाबत राऊत यांच्यावरसुद्धा गुन्हा नोंदवावा, अशी मागणी करत भाजप महिलांनी मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यामध्ये तसे पत्र दिले आहे.
काय आहे पत्रात..
९ डिसेंबर २०२१ रोजी १०:३० च्या सुमारास टीव्ही नाईन चॅनलवरती शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मुलाखत दिली असून त्यामध्ये त्यांनी पत्रकाराच्या प्रश्नाला उत्तर देताना भाजपच्या नेत्यांना ते *** आहेत' असे दोन वेळा बोलून आक्षेपार्ह वक्तव्य केले. सदरची मुलाखत मी ऑनलाईन युट्यूबवर पाहिली आहे. सदरची क्लिप पाहताना मी भारतीय जनता पक्षाची नगरसेविका व स्त्री या नात्याने मला शिवसेना खासदार संजय राऊत यांचे शब्द खूप वीभत्स, अश्लील व माझ्या स्त्री मनास लज्जा उत्पन्न करणारे वाटले. तसेच, त्यांनी अशा प्रकारे लैंगिक शेरे वापरून आम्हा भाजप पक्षाच्या सर्व महिला कार्यकर्त्यांचा विनयभंग करून आमची प्रतिमा मलीन केली आहे. तरी आज ९ डिसेंबर २०२१ रोजी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी त्यांचे दिल्ली येथील कार्यालयात बसून पत्रकारास मुलाखत देताना, भाजप नेत्यांविषयी 'ते *** आहेत' असे वीभत्स, अश्लील व लैंगिक शेरे भारणारे वक्तव्य केल्याने सदरबाबत योग्य चौकशी करून पुढील कार्यवाही होण्यास विनंती.
आवाज अधिक बुलंद करणार
आता या प्रकरणी भाजप अधिक आक्रमक होताना दिसणार आहे. याबाबत जर संजय राऊत यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला नाही तर, ही लढाई रस्त्यावर लढली जाणार व संपूर्ण मुंबईभर हा आवाज उठवला जाणार, असेही भाजप महिला मोर्चातर्फे सांगण्यात आले.
हेही वाचा - 'किलर स्कॉडन'ला राष्ट्रपतींच्या हस्ते नामांकन, पहिल्यांदाच नौदलाच्या तुकडीचा असा सन्मान