मुंबई - एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या 40 आमदारांनी बंडखोरी केली. त्यामुळे शिवसेनेत मोठी फुट पडली आहे. त्यातच शिवसेना नेते, खासदार संजय राऊत हे दररोज शिंदे गटावर आरोप करत आहेत. माझा आवाज बंद करण्यासाठी मला ईडी करून नोटिसा पाठवल्या जात आहेत, असा आरोप त्यांच्याकडून येत आहे. त्यावर भाजप नेते प्रवीण दरेकरांनी संजय राऊतांना टोला लगावला आहे. संजय राऊत यांनी कोसळणारा पक्ष थांबवण्यासाठी तोंडाला पट्टी बांधावी, असा सल्ला दरेकरांनी दिला आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधत ( Pravin Darekar Taunt Sanjay Raut ) होते.
'कोसळणारा डोलारा थांबवा' - प्रवीण दरेकर म्हणाले की, संजय राऊतांच्या आवाजात दम नाही. त्याच्यामुळे त्यांचा आवाज कमी करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. संजय राऊत यांनी किती भांडवल करावं याला एका मर्यादा आहे. या देशामध्ये ईडी नोटीस कोणाला गेल्या नाहीत?, पण ईडीच्या नोटीसांच्या आधारे मी शेर आहे, मी शेर आहे, मी घाबरत नाही. त्याच राजकीय भांडवल करत फायदा करण्याचा त्यांचा केविलवाणा प्रयत्न दिसतोय. आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांनी पक्षाचा जो डोलारा उभा केला तो आज नजरेसमोर कोसळतोय. तर संजय राऊत साहेबांनी फालतू बडबड बंद करून पक्षाचा कोसळणारा डोलारा सांभाळण्यासाठी जरा तोंडाला पट्टी बांधावी. पक्ष कोसळला तरी चालेल पण बोलणे हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, या पद्धतीने त्यांचे रोज अशा प्रकारचं बोलणं सुरू आहे, असा टोला दरेकरांनी लगावला आहे.
'आत्मचिंतन करण्याची गरज' - शिवसेनेचे ५४ पैकी ४० आमदार डोळ्यासमोर जातात, १२ खासदार जातात. महाराष्ट्रातल्या पदाधिकाऱ्यांची दुसऱ्या पक्षात जायला रीघ लागली आहे. पक्ष कोसळतोय त्याकडे लक्ष द्या, असे सांगत सरकार भक्कमपणे चालवण्यासाठी देवेंद्र फडणवीस साहेब आणि शिंदे साहेब सक्षम आहेत. हे दौरे करतात, फिरतात. आदित्य ठाकरेंनी २ दिवस दौरे केले. आता कुठे आहेत माहित नाही, हा काही पार्ट टाईम जॉब नाही आहे. यांच्याकडून झालेल्या चुकांचं आत्मचिंतन करायच्या ऐवजी सोपा मार्ग म्हणून सरकारवर टीका करण्याचं काम हे करत आहेत, असेही दरेकरांनी म्हटलं आहे.
'मुंगेरी लाल के हसीन सपने पाहणे सोडून द्यावे' - योग्यवेळी मंत्रिमंडळ विस्तार होईल त्याची काळजी संजय राऊत यांनी करू नये. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस सक्षम आहेत. त्यांनी गेल्या २० ते २५ दिवसांच्या कालावधीमध्ये जे निर्णय घेतले ते तुम्हाला अडीच वर्षात जमले नाहीत. देवेंद्र फडणवीसांचा बैठकांचा सिलसिला सुरू आहे. जनतेला विश्वास आहे हे दोघंही मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री आमच्या सुखदुःखाची रोज काळजी घेत आहेत. त्याच्यामुळे त्यांनी मुंगेरी लाल के हसीन सपने या ठिकाणी पाहणे सोडून द्यावे, असेही दरेकर म्हणाले.
'अजित पवारांचा हिरमोड झाला' - विरोधी पक्षनेते अजित पवार राज्यात दौरे करत असताना काय अनुभव घेत आहेत ते प्रसारमाध्यमातून मी पाहतोय असे सांगत, जनतेनी आपल्या भावना व्यक्त केल्या आणि अजित पवारांना असं वाटलं होत की जनतेच्या मनात रोष आहे, असंतोष आहे. त्याला आपण त्या ठिकाणी फुंकर घालावी. परंतु, ज्या वेळेला अजित पवारांनी विचारलं की पंचनामे झाले का? समोरून उत्तर आलं होय अन् अजित पवारांचा हिरमोड झाला. त्या ठिकाणी फिरण्याव्यतिरिक्त मला वाटतं त्यांना दुसरा कुठला कार्यक्रम नाही आहे. त्यांनी फिरावं महत्वपूर्ण सूचना असतील तर मुख्यमंत्र्यांना कराव्यात. हे शेतकऱ्यांचे हित जपणारे सरकार आहे. त्यांच्या सुचनांचाही आदर केला जाईल, असेही दरेकरांनी स्पष्ट केलं.
हेही वाचा - Mumbai High Court : महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्या निवडणुकांना स्थगिती देण्यास उच्च न्यायालयाचा नकार; पण...