मुंबई - भाजपा आमदार नितेश राणे यांना मोठा धक्का बसला आहे. संतोष परब हल्ला प्रकरणी नितेश राणे यांना ४ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. कणकवली दिवाणी न्यायालायने हा निर्णय दिला आहे. याबाबत आता भाजपा नेत्यांच्या प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे. विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी याबाबत बोलताना महाविकास आघाडी सरकार सूडबुद्धीने नितेश राणेबाबत वागत असल्याचे सांगत उच्च न्यायालयात त्यांना दिलासा नक्की भेटेल, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
शिवसैनिक संतोष परब हल्ला प्रकरणी आमदार नितेश राणेंना दोन दिवसांची पोलीस कोठडी सूनावण्यात आली आहे. यावर बोलताना विधान परिषद विरोधी पक्षनेते, प्रवीण दरेकर यांनी सांगितले की, महाविकास आघाडी सरकारचा पहिल्यापासून अट्टहास होता की नितेश राणे यांना कुठल्याही प्रकारे अटक करावी. त्या प्रकारे ते प्रयत्न करत होते. त्यासाठी त्यांचा पोलिसांवर प्रचंड दबाव होता. नितेश राणे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार त्यांनी शरणागती पत्करली. पण या सरकारने त्यांना अटक करून पोलीस कोठडी सुनावली. सरकार जरी अशा प्रकारे सूडबुद्धीने वागत असेल तरी उच्च न्यायालयावर आमचा पूर्ण विश्वास आहे. तिथे आम्हाला न्याय नक्की भेटेल, असेही प्रवीण दरेकर म्हणाले.
काय आहे प्रकरण ?
कणकवली शहरातील नरडवे फाटा येथे शिवसैनिक संतोष परब यांच्यावर हल्ला झाला होता. या हल्ल्याचा कट रचणे व कटात सामील असल्याच्या संशयावरून कणकवली पोलिसांत आमदार नितेश राणेंसह अन्य संशयितावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर आमदार राणे यांनी जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. जिल्हा न्यायालयाने हा अर्ज फेटाळल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयात अपील करण्यात आले होते. उच्च न्यायालयानेही त्यांचा जामीन अर्ज फेटाळला.
हेही वाचा - Nitesh Rane Arrested : नितेश राणे यांना अटक, दोन दिवसांची पोलीस कोठडी