मुंबई- प्रसिद्ध गीतकार आणि कवी जावेद अख्तर यांनी एका प्रसार माध्यमाला मुलाखत देत असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तुलना तालिबान्यांसोबत केली होती. याचे पाडसाद संपूर्ण देशभर उमटत आहेत. या वादावर आता शिवसेनेकडून भाष्य करण्यात आले असून, शिवसेनेचे मुखपत्र,'सामना' वृत्तपत्रातून 'राष्ट्रीय स्वयंसेवक संघा'ची तुलना तालिबानी यांच्या सोबत करणे चुकीच असल्याच म्हंटल आहे. मात्र शिवसेनेच्या या भूमिकेवर भारतीय जनता पक्षाचे आमदार राम कदम यांनी शिवसेनेला डिवचल आहे.
आरएसएसची तालिबान्यांशी तुलना करणाऱ्या 'जावेद अख्तर यांची भूमिका अयोग्य असेल तर, मग वाट कसली बघता, त्यांना अटक करा" शिवसेनेला कोणी रोखले आहे? असे आव्हान भाजपा आमदार राम कदम यांनी शिवसेनेला दिले आहे. तसेच शिवसैनिकांनी त्यांच्या घरासमोर जाऊन राडा करावा, असा चिमटाही राम कदम यांनी काढला आहे. याच बरोबर जावेद अख्तर यांनी एकदा अफगाणिस्तानात जावे. अफगाणिस्तानमध्ये तालिबानी कसा व्यवहार करतात हे बघावं. हे सर्व बघितल्यानंतर जावेद अख्तर यांना सद्बुद्धी येईल आणि ते देशाची माफी मागतील, असा टोलाही राम कदम यांनी अख्तर यांना लगावला आहे.
काय म्हणाले होते जावेद अख्तर
एका प्रसार माध्यमाला मुलाखत देत असताना, जावेद अख्तर यांनी भारतात असणारे 'राष्ट्रीय स्वयंसेवक संघ' आणि 'बजरंग दल' सारख्या संघटना तालिबानी सारखेच कट्टरवादी संघटना आहेत. या संघटनेची अडचण भारतीय संविधान आहे. देशात होणाऱ्या मॉबलिंचींगच्या घटना म्हणजे तालिबानी प्रवृत्तीच आहे, असं वक्तव्य केलं होते.
त्यावर शिवसेनेने आज हिंदू राष्ट्र’ संकल्पनेस पाठिंबा देणारे तालिबानी विकृतीचे आहेत, असे कसे म्हणता येईल? असा प्रश्न उपस्थित केला. तसेच मागील काळात ‘बीफ’ प्रकरणावरून जो धार्मिक उन्माद घडला व त्या सर्व प्रकरणात जे झुंडबळी गेले, त्याचे समर्थन शिवसेनाच काय तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही केलेले नाही, असे म्हणत अख्तर यांनी तालिबानशी केलेली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तुलना ही चुकीचे असल्याचे मत ‘सामना’च्या अग्रलेखामधून व्यक्त करण्यात आले आहे.