मुंबई - भाजपचे माजी खासदार किरीट सोमैया यांना मानहानीच्या दोन खटल्यांमध्ये मंगळवारी अतिरिक्त मुख्य महानगर न्यायदंडाधिकारी न्यायालयाने वैयक्तिक हमीवर जामीन मंजूर केला आहे. तसेच पुरावे नोंदवण्यासाठी पुढील सुनावणी २५ नोव्हेंबरला घेण्यात येणार आहे.
हेही वाचा - #jiodown : जिओचे नेटवर्क डाऊन! वापरकर्त्यांच्या तक्रारीनंतर जिओने दिले हे स्पष्टीकरण
- काय आहे प्रकरण?
किरीट सोमैया यांनी सोशल मीडियावर आमची बदनामी करणारी पोस्ट केली. त्यामुळे आम्हाला नाहक त्रास सहन करावा लागला, असा दावा 'अर्थ' या स्वयंसेवी संस्थेने व सामाजिक कार्यकर्ते प्रवीण कलमे यांनी केला होता. त्यानंतर सोमैयांविरोधात अॅड. अदनान शेख व अॅड. अमानी खान यांच्यामार्फत मानहानीचे फौजदारी खटले दाखल केले होते.
न्या. पी. आय. मोकाशी यांनी याविषयी प्राथमिक पुराव्यांची तपासणी केल्यानंतर प्रकरणांची दखल घेऊन सोमैया यांना समन्स बजावले होते. त्यानंतर सोमैया मंगळवारी न्यायालयात हजर राहिले होते. आपण दोषी नसल्याचा दावा त्यांनी केला. त्यानंतर न्यायालयाने त्यांना दोन्ही प्रकरणात प्रत्येकी १५ हजार रुपयांच्या वैयक्तिक हमीवर जामीन मंजूर केला.
हेही वाचा - घरगुती गॅसच्या दरात 15 रुपयांनी वाढ; जाणून घ्या, नवे दर