मुंबई - समाजवादी पक्षाचे महाराष्ट्र अध्यक्ष आणि आमदार अबू आझमी यांनी मंगळवारी मध्यरात्री नागपाडा येथे नियम भंग भडकाऊ भाषण, महिला पोलीस अधिकाऱ्यांना धमकी, मास्क न लावता पोलिसांशी अन्य नागरिकांच्या उपस्थितीत हुज्जत घालणे, असे प्रकार केल्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करून कडक कारवाई व्हावी, अशी मागणी महाराष्ट्र भाजप उपाध्यक्ष किरीट सोमैया यांनी नागपाडा पोलीस अधिकाऱ्यांना पत्र देत केली आहे.
26 मेच्या रात्री 11 वाजण्याच्या सुमारास मुंबई मध्य रेल्वे स्थानकाबाहेरील चौकात 100 नागरिकांना एकत्र करत, त्यांचा समोर उत्तेजित करणारे भाषण अबू आझमी यांनी केले. तसेच पोलिसांविरुद्ध भावना भडकवण्याचा प्रयत्न, पोलिसांच्या कामात अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न त्यांनी केला, असे किरीट सोमैया यांनी अबू आझमी यांचा त्या दिवशीचा व्हिडिओ पुरावा म्हणून दाखवत म्हटले आहे.
व्हिडिओमध्ये दिसत आहे की, अबू आझमी यांनी रात्री लोकांना जमवत, मुंबई महिला पोलिसांना उद्देशून, "ये औरत कहती है कि आप पुलिस पे इल्जाम लगाते हो, मै बात नही करूंगी। तेरे बाप के बाप के बाप को बात करनी पडेगी" असे म्हटले. 26 आणि 27 मेच्या रात्री मुंबई मध्य स्थानकाजवळ नागपाडा पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस अधिकारी शालिनी शर्मा यांच्या कामात अडथळा निर्माण केला. त्यामुळे आपत्ती व्यवस्थापन कायदा व कलम 188 आयपीसीच्या अंतर्गत गुन्हा दाखल करावा, अशी मागणी भाजप नेते किरीट सोमैया यांनी केली आहे.