मुंबई - वाहनावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी उलटपक्षी त्यांच्यावर एफआयआर दाखल करण्यात आला, असा आरोप भाजप नेते किरीट सोमैया ( BJP Leader Kirit Somaiya ) यांनी केला आहे. त्यासंदर्भात भाजप नेते किरीट सोमैया हे आज मुंबईतील खार पोलीस ठाणे येथे दुपारी बारा वाजता दाखल झाले. त्यानंतर त्यांनी त्यांच्या संदर्भात दाखल केलेल्या ( FIR ) तक्रारीविषयी चर्चा केली. हा एफआयआर पूर्णतः बनावट असून ज्यांनी हा एफआयआर बनवला त्यांच्यावर, तसेच मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे ( Mumbai Police Commissioner Sanjay Pandey ) यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी याप्रसंगी केली. तसेच याबाबत बुधवारी (दि. 27 एप्रिल) ते राज्यपालांना भेटणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
एफआयआरवर स्वाक्षरी नाही - भाजप नेते किरीट सोमैया यांच्यावर त्यांनी विना स्वाक्षरी केलेला एफआयआर दाखल करण्यात आला होता. तो एफआयआर पोलिसांनी आपल्या वेबसाईटवर टाकला होता. त्याच्यावर स्वाक्षरी नसल्याने जाणून बुजून मला या प्रकरणात गोवण्यासाठी हा एफआयआर दाखल करण्यात आला असे किरीट सोमैया म्हणाले. खोटा एफआयआर मुंबई पोलीस आयुक्तांनी बनवला आहे, असा आरोप करत त्यांच्यावर क्रिमिनल ॲक्ट अंतर्गत कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.
मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडेवर कारवाई करा - माझ्यावर 89 गुंडानी हल्ला केला होता. ते प्रकरण दाबण्यासाठी मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्या आदेशाने सोमवारी (दि. 25 एप्रिल) सकाळी वांद्रे पोलीस ठाण्यात माझ्यावर खोटा एफआयआर रजिस्टर केला होता. ही सर्व कारवाई मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी केली आहे. भा.दं.वी.चे कलम 154 व 156 अंतर्गत त्या एफआयआरवर माझी स्वाक्षरी हवी होती. परंतु माझी स्वाक्षरी नसतानाही माझ्यावर कारवाई करण्याचे काम मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी सुरू केले होते. मुंबई पोलीस आयुक्तांना माहित आहे हे सर्व उद्धव ठाकरे यांच्या गुंडांना वाचवण्यासाठी केल जात आहे, असा आरोपही त्यांनी याप्रसंगी लगावला.
उद्या घेणार राज्यपालांची भेट - या प्रकरणाची दखल घेतली नाही व दोषींवर कारवाई केली नाही तर यापुढील संघर्ष अटळ आहे, असा इशारा यावेळी किरीट समैया यांनी दिली आहे. त्याचबरोबर याबाबत बुधवारी (दि. 27 एप्रिल) राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
हेही वाचा - Sanjay Raut on Kirit Somaiya : तो माथेफिरू हनुवटीवर टोमॅटो सॉस लावून येतो आणि.. संजय राऊतांचा सोमैयांना टोला