मुंबई - राष्ट्रवादीचे नेते आणि सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधात बलात्काराचा गंभीर आरोप झाल्यानंतर त्यांनी राजीनामा द्यावा, यासाठी दबाव वाढत चालला आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत मुंडे यांचा राजीनामा घेतला जाणार नसल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता मुंडे यांना तूर्तास दिलासा मिळाला असून राष्ट्रवादीकडून अभय मिळाल्याचे म्हटले जात आहे. पण आता विरोधकांनी मात्र यावर आक्रमक पवित्रा घेतला आहे. मुंडेंना अभय देणारे शरद पवार कोण? मुंडेंना राजीनामा द्यावाच लागेल, अशा शब्दात भाजपा नेते किरीट सोमैया यांनी खास 'ईटीव्ही भारत'शी बोलताना थेट पवारांवरच निशाणा साधला आहे.
सोमैया यांना धमकीचे फोन
रेणू शर्मा नावाच्या तरूणीने मुंडे यांच्याविरोधात पोलिसांकडे बलात्काराची तक्रार नोंदवली आणि त्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. विरोधकांनी ही संधी अजिबात न सोडता मुंडेच्या राजीनाम्याची मागणी उचलून धरली आहे. सोमैया यांनी तर यापुढे जात थेट निवडणूक आयोगाकडेच धाव घेत मुंडे यांच्याविरोधात कारवाई करण्याची मागणी केली आहे. एकूणच आता मुंडेच्या राजीनाम्यासाठी विरोधकांकडून दबाव कायम आहे. या पार्श्वभूमीवर सोमैया यांना धमकीचे फोन येत असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.
'...हे समाज सहन करून घेणार नाही'
राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्याने महिलांचे लैंगिक शोषण करायचे, आणि राष्ट्रवादी काँग्रेसचेच नेते आणि मंत्री त्यांना अभय देणार? हे समाज चालवून घेणार नाही. मंत्री असून एक बायको, दुसरी बायको, तिसरी बायको? बलात्काराची तक्रार करणाऱ्या महिलेविरोधात जर दुसऱ्या पुरुषांनी तक्रार केली आहे, त्याची वेगळी तक्रार करावी. तेव्हा अशावेळी शरद पवार मुंडेंना अभय देणारे कोण? मुंडेंना राजीनामा द्यावाच लागेल, असे सोमैया यांनी म्हटले आहे.