मुंबई - महापौर आणि त्यांच्या मुलाची कंपनी ज्या पत्त्यावर नोंदणीकृत आहे, त्याच पत्त्यावर आणखी आठ बोगस कंपन्यांची नोंद आहे. यासंदर्भातील मालकी हक्क, आर्थिक हितसंबंध, व्यवहारातील पारदर्शकता आणि त्यातील खुलाशाबाबत स्पष्टता हवी, अशी मागणी प्रधान सचिव भूषण गगराणी यांच्याकडे भाजप नेते किरीट सोमैय्या यांनी केली आहे. त्यांनी याबाबत राज्य सरकारकडे टीका केली आहे.
यावर महापौर किशोरी पेडणेकर यांनी आरोपांचे खंडन केले. ही कंपनी २०११ सालीच स्थापन झाली होती, जी महापालिकेची व्हेंडरही आहे. रितसर प्रक्रिया पूर्ण करून सगळ्यात कमी किमतीला 'कोटेशन' देऊन काम त्या कंपनीने मिळवले आहे. माझा मुलगा त्या कंपनीत 'पार्टनर' आहे, मी ते नाकारत नाही, असे किशोरी पेडणेकर म्हणाल्या. महापौर असल्यामुळे आपले नाव बदनाम करण्याचे काम केले जात आहे, असे त्या म्हणाल्या होत्या.
हेही वाचा - नायगाव बीडीडीचा चेंडू आता 'यांच्या' कोर्टात ; एल अँड टीचे मन वळवण्यात म्हाडा अपयशी
यावर भाजपकडूनदेखील टीका होत आहे. महापालिकेच्या कोविड सेंटरचे कंत्राट किश कॉर्पोरेट सर्व्हिसेस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला दिल्याची नोंद आहे. या कंपनीच्या पत्त्यावर अजून इतर आठ कंपन्यांची नोंद आहे. याची आम्ही राज्य सरकारकडे तक्रार केली आहे. यासंदर्भातील मालकी हक्क, आर्थिक हितसंबंध, व्यवहारातील पारदर्शकता आणि त्यातील खुलाशाबाबत स्पष्टता हवी, असे किरीट सोमैय्या यांनी म्हटले आहे.