मुंबई - ज्येष्ठ भाजपा नेते एकनाथ खडसे आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीत जाणार असल्याची जोरदार चर्चा आहे. मात्र अद्याप मी मुक्ताई नगरामध्येच असून कोणताही निर्णय घेतला नसल्याचे खडसे यांनी ईटीव्ही भारतला सांगितले आहे.
हेही वाचा - मुंबईत मुसळधार पाऊस; रुळांवर पाणी साचल्याने लोकल वाहतूक ठप्प
खडसे यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क झाला असता, त्यांना राष्ट्रवादीत प्रवेश करण्यासंदर्भात विचारणा करण्यात आली. त्यावेळी खडसे म्हणाले की, मी मुंबईत नाही, अद्याप मुक्ताईनगरात आहे. राष्ट्रवादीत जाणार, अशी अशी चर्चा आहे. त्याचबरोबर शिवसेनेत आणि काँग्रेसमध्ये जाणार अशीही चर्चा आहे. पण मी अद्याप निश्चित भूमिका घेतली नाही. अजूनही मुक्ताईनगरला असल्याचे खडसे म्हणाले.
'गेल्या दोन महिन्यांपासून आपण आजारपणामुळे मुक्ताईनगरातच आहोत. माझ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवेशाची सध्या जोरदार चर्चा आहे. याआधी शिवसेना आणि काँग्रेसच्या प्रवेशाचीही चर्चा होती. मात्र, मी अजून पक्षांतराबाबतचा कोणताही निर्णय घेतलेला नाही. तसा काही निर्णय घेतला तर तो मी स्वतः जाहीर करेन,' असेही खडसेंनी यावेळी सांगितले. आता भाजपावर नाराज असलेले खडसे काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. खडसे यांनी सत्ताधारी पक्षात प्रवेश केल्यास भाजपाला हा मोठा सेटबॅक बसेल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
हेही वाचा - मुंबईत पावसाचा कहर; नायर रुग्णालयाच्या कोव्हिड विभागात शिरले पाणी; रुग्णांचे हाल
एकनाथ खडसेंनी यांनी गेल्या आठवड्यात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर थेट हल्ला केला होता. फडणवीस यांनी आपल्याला त्रास दिला, असा जाहीर आरोप त्यांनी केला होता. तर, पक्षाने अन्याय केल्यामुळे खडसेंनी पक्षात राहू नये, असा सूरही त्यांच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे. ते शिवसेनेत जाणार की, राष्ट्रवादीत जाणार याबाबत चर्चा सुरू झाली आहे. शिवसेना नेते तथा राज्याचे उच्च तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी त्यांना शिवसेनेत येण्याचे आवाहन केले होते. तर, राष्ट्रवादीच्या नेत्यांनीही ते पक्षात आल्यास त्यांचे स्वागत आहे, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली होती. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील जळगाव जिल्ह्यात येऊन आढावा घेणार होते. मात्र, आता पक्षाचे नेते शरद पवारच आढावा घेत असल्याने राष्ट्रवादीच्या बैठकीत काय निर्णय होतो, याकडे लक्ष असणार आहे.