मुंबई - केंद्रीय मंत्रिमंडळात नव्याने सामील झालेल्या महाराष्ट्राच्या चारही मंत्र्यांकडून जनआशीर्वाद यात्रेची सुरुवात झालेली आहे. दिल्लीच्या पक्षश्रेष्ठींच्या आदेशानुसार ही जन आशीर्वाद यात्रा सुरू करण्यात आली आहे. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आणि महापालिका निवडणुका समोर ठेवून जन आशीर्वाद यात्रा काढल्याचे मत राजकीय विश्लेषकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
केंद्र सरकारमध्ये नव्याने सामील झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळात असलेल्या महाराष्ट्रातील चार मंत्र्यांची जनआशीर्वाद यात्रा भारतीय जनता पक्षाकडून काढण्यात आली आहे. 16 ऑगस्टपासून ही जनआशीर्वाद यात्रा सुरु झाली असून, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांचा पालघर पासून दौरा सुरू झाला आहे. तर तिथेच केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी 16 ऑगस्टपासून ठाणे जिल्ह्यामध्ये जन आशीर्वाद यात्रेला सुरुवात केली. तर दुसरीकडे केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड हे बीडमधून आपल्या जन आशीर्वाद यात्रेची सुरुवात करत आहेत. तर तिथेच केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा जन आशीर्वाद यात्रेसाठीचा कोकण दौरा 19 ऑगस्टपासून सुरू होणार आहे.
का काढली जनआशीर्वाद यात्रा?
केंद्रीय मंत्रिमंडळात नव्याने सामील झालेले या नव्या मंत्र्यांना भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाकडून जनआशीर्वाद यात्रा काढण्याचे आदेश देण्यात आले आहेत. महाराष्ट्रात वेगवेगळ्या भागात जाऊन लोकांचा आशीर्वाद घेऊन भारतीय जनता पक्षाबद्दल सामान्य माणसांमध्ये विश्वास वाढवण्यासाठीची कामगिरी आता या नवीन चार मंत्र्यांच्या खांद्यावर देण्यात आली आहे. या जन आशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षात अजून उत्साहा निर्माण करण्याचे काम होणार असल्याचे मतं राजकीय विश्लेषक अजय वैद्य यांनी मांडल आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर विरोधी पक्षात बसलेल्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांमधून विधानसभा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, विधानपरिषद विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर, आमदार आशिष शेलार आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या व्यतिरिक्त इतर नेते जनतेशी थेट संवाद साधताना दिसत नाही. त्यामुळे महाराष्ट्रातले नव्याने झालेले मंत्री थेट जनतेशी संवाद साधणार आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आणि महानगरपालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाने याबाबत विचार केला असल्याचं मतं ही राजकीय विश्लेषक अजय वैद्य यांनी व्यक्त केले.
राणेंच्या दौऱ्याची सुरुवात बाळासाहेबांच्या स्मृती स्थळाचं दर्शन घेऊन -
नव्याने केंद्रीय मंत्रिमंडळात सामील झालेले केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर भारतीय जनता पक्षाच्या दिल्लीतील पक्षश्रेष्ठींनी मुंबई महानगरपालिकेची जबाबदारी सोपवली गेली असल्याची माहिती आहे. यासोबतच नारायण राणे 19 ऑगस्टपासून कोकणात जनआशीर्वाद यात्रा करणार आहेत. नारायण राणे हे 19 ऑगस्टला दिल्लीतून मुंबईला येतील. त्यानंतर नारायण राणे यांच्या जनआशीर्वाद यात्रेची सुरूवात होईल. मात्र यात्रेची सुरुवात होण्याआधी नारायण राणे बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर जाऊन दर्शन घेणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. नारायण राणे यांनी याआधी कधीही बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती स्थळावर दर्शन घेण्यासाठी गेले नव्हते. मात्र यावेळी ठरवून नारायण राणे बाळासाहेबांच्या स्मृती स्थळाचे दर्शन घेणार आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्यावर असलेली भारतीय जनता पक्षाचे आस्था अजूनही कायम आहे. हा संदेश देण्यासाठी नारायण राणे स्मृती स्थळावरून दर्शन घेणार असल्याचे मतं राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केले आहे. मात्र नारायण राणे हे जर बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती स्थळावर जाणार असतील तर शिवसैनिक नाराज होऊ शकतील अशी शक्यता ही त्यांच्याकडून वर्तवण्यात आली आहे.
ही तर तळतळाट यात्रा - काँग्रेस
भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या नव्या सदस्यांकडून काढण्यात येणारी यात्रा ही जन आशीर्वाद यात्रा नसून, तळतळाट यात्रा आहे, असा टोला मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी लगावला आहे. केंद्र सरकारने देशाच्या जनतेला बेरोजगारी महागाईच्या खाईत लोटले. जनतेची अवस्था बिकट असताना अशाप्रकारे जन आशीर्वाद यात्रा काढून केंद्र सरकारला काहीही उपयोग होणार नाही. केवळ जनतेचा तळतळाट केंद्र सरकारला लागेल त्यामुळे ही तळतळाट यात्रा ठरेल असं मत भाई जगताप यांनी व्यक्त केले.