मुंबई - कोरोना लसीवरून राजधानी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात पोस्टर लावण्यात आले होते. पंतप्रधानांवर निशाणा साधताना, मोदीजी आमच्या मुलांची लस परदेशात का पाठवली? असा सवाल विचारला होता. अशा प्रकारची बॅनरबाजी घाटकोपर येथे देखील काँग्रेसतर्फे करण्यात आलेली आहे. या बॅनरबाजी नंतर भाजप कार्यकर्त्यांनी हे बॅनर फाडले. त्याबरोबर या ठिकाणी खासदार मनोज कोटक यांनी देखील धाव घेत काँग्रेस कार्यकर्त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
हेही वाचा - तौक्ते चक्री वादळानंतर सत्ताधारी आणि विरोधकांचे पाहणी दौरे, मात्र मदत कधी?
काँग्रेसने लसीकरणाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात घाटकोपर, विद्याविहार येथे लावलेले बॅनर आज भाजपच्या कार्यकर्त्यांनी फाडून टाकले. तसेच, घाटकोपर पूर्वेकडील राजकीय वाद वाढू नये म्हणून महानगरपालिकेने देखील हे बॅनर उतरवायला सुरुवात केली. यानंतर खासदार मनोज कोटक हे त्या ठिकाणी दाखल झाले होते. त्यांनी सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्यासह पंत नगर पोलीस ठाणे गाठले. दिल्लीत ज्याप्रमाणे बॅनर लावणार्यांवर कारवाई करण्यात आली, तशीच कारवाई येथे बॅनर लावणाऱ्यांवर देखील करावी, अशी मागणी केली.
कोरोना काळात काँग्रेसने काहीच केले नाही - कोटक
काँग्रेसला विनाशकाले विपरीत बुद्धी सुचते आहे, मुख्यमंत्री राजकारण करू नका म्हणतात आणि त्यांचा एक घटक पक्ष असे करतो. कोरोना काळात काँग्रेसने काहीच काम केले नाही. आम्ही या बाबत पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची मागणी करतो आहे, असे मनोज कोटक म्हणाले.
हेही वाचा - जोगेश्वरीत 140 खाटांच्या कोविड केअर सेंटरचे लोकार्पण; लहान मुलांसाठी आहे विशेष व्यवस्था