मुंबई - भाजपचे ईशान्य मुंबई (उत्तर पूर्व) येथील विद्यमान खासदार किरीट सोमय्या यांना मित्रपक्ष शिवसेनेकडून मोठा विरोध आहे. या ठिकाणी भाजपला नवा उमेदवार द्यावा लागत आहे. या मतदारसंघात पर्यायी उमेदवार म्हणून प्रकाश मेहता, मनोज कोटक, प्रवीण छेडा यांची नावे चर्चेत असून यापैकी कोणाला उमेदवारी द्यायची यावरून भाजपची डोकेदुखी वाढली आहे.
मागील लोकसभा निवडणुकीत उत्तर-पूर्व म्हणजेच ईशान्य मुंबई लोकसभा मतदार संघातून भाजपचे किरीट सोमय्या मोठ्या मताधिक्याने निवडून आले होते. लोकसभा निवडणुकीनंतर भाजप आणि शिवसेनेमधील युती तुटल्याने सोमय्या यांनी शिवसेना आणि सेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप केले होते. यामुळे शिवसेनेमध्ये सोमय्या यांच्या विरोधात प्रचंड नाराजी आहे.
आगामी लोकसभा निवडणूक शिवसेना आणि भाजप युतीच्या माध्यमातून एकत्र लढवत आहे. निवडणुका एकत्र लढवल्या जात असल्या तरी ईशान्य मुंबईमध्ये मात्र सोमय्या यांना शिवसेनेचा विरोध असल्याने भाजपकडून नवा उमेदवार कोण असेल याची चाचपणी केली जात आहे. नवा उमेदवार देताना तो शिवसेनेलाही आपला उमेदवार वाटेल याची काळजी घेतली जात आहे.
ईशान्य मुंबई लोकसभा मतदार संघासाठी घाटकोपर येथील ६ वेळा निवडूण आलेले आमदार व सध्याचे गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता, मुंबई महापालिकेतील भाजपचे गटनेते मनोज कोटक तसेच काँग्रेसमधून भाजपत प्रवेश केलेले पालिकेतील माजी गटनेते प्रवीण छेडा यांच्या नावाचा विचार सुरू आहे. या लोकसभा मतदारसंघात गुजराती मतदार जास्त असल्याने प्रकाश मेहता, मनोज कोटक आणि प्रवीण छेडा या तिघांपैकी एकाला तिकीट निश्चित दिले जाणार आहे.