मुंबई - मुख्यमंत्र्यानी हनुमान जयंतीच्या दिवशी हनुमान चालीसा पठण करावे अन्यथा आम्ही मातोश्रीवर येऊन हनुमान चालीसा पठण करू असा इशारा आमदार रवी राणा व खासदार नवनीत राणा दाम्पत्याने मुख्यमंत्र्यांना दिला होता. १६ एप्रिलला हनुमान जयंती राज्यभरात साजरी करण्यात आली. परंतु मुख्यमंत्र्यांनी हनुमान चालीसा पठण ( Hanuman Chalisa reading ) न केल्याने रवी राणा ( Ravi Rana and Navneet Rana Matoshri house Hanuman chalisa ) यांनी मातोश्री बाहेर येऊन हनुमान चालीसा पठण करणार, असा इशारा दिला असल्याने वातावरण तापले आहे. विशेष करून मातोश्री बाहेर शिवसैनिक ( Shivsainik outside Matoshri ) दररोज मोठ्या प्रमाणात जमा होऊन राणा दाम्पत्याची वाट बघत आहेत. आज रवी राणा व नवनीत राणा मुंबईत येणार असल्याच्या माहितीमुळे सकाळपासूनच शिवसैनिक मोठ्या प्रमाणात मातोश्री बाहेर जमा झाले होते.
सकाळीच रवी राणा व नवनीत राणा मुंबईत पोहचले. परंतु ते नक्की कुठे आहेत याचा ठावठिकाणा कोणालाच लागत नसल्याने शिवसैनिक सुद्धा सर्वत्र त्यांचा शोध घेत होते. वास्तविक राणा दाम्पत्य रात्रीच्या गाडीने अमरावती येथून उद्या मुंबईत दाखल होतील, अशी प्राथमिक माहिती होती. परंतु सकाळी १० वाजण्याच्या सुमारास आमदार रवी राणा व खासदार नवनीत राणा मुंबईत दाखल झाल्याच्या बातम्या सर्व ठिकाणी पसरल्याने त्यांच्या शोधासाठी शिवसैनिक मुंबई पालथी घालू लागले. ते कुठल्या विमानाने आले, कधी आले, कुठे गेले हे समजत नसल्याने शिवसैनिक एकमेकाच्या संपर्कामध्ये होते.
नंदगिरी अतिथीगृहात केले होते बुकिंग : मुंबई विमानतळ शेजारी असलेल्या नंदगिरी अतिथीगृहात त्यांनी बुकिंग केल्याची बातमी ही साधारण ११ च्या सुमारास पसरल्याने मोठ्या प्रमाणावर शिवसैनिकांनी नंदगिरी या सरकारी अतिथीगृहाबाहेर गर्दी केली. या दरम्यान त्यांनी नंदगिरी गेस्ट हाऊसमध्ये चौकशी केली असता फक्त त्यांच्या नावाने तिथे बुकिंग करण्यात आल्याचे समजले. परंतु ते तेथे नव्हते. तरी सुद्धा शिवसैनिकांनी मोठ्या प्रमाणामध्ये राणा दाम्पत्याच्या विरोधात घोषणाबाजी करत तिथे आंदोलन छेडले. तर दुसरीकडे मातोश्रीबाहेर मागच्या शनिवारपासून गर्दी करणारे शिवसैनिक आज मोठ्या प्रमाणात दिसून आले. राणा दाम्पत्य आता मुंबईत दाखल झाले आहे. तर त्यांना कुठल्याही परिस्थितीत सडेतोड उत्तर देण्याची तयारी त्यांनी केली होती. म्हणूनच मातोश्रीवर जमा असलेल्या शिवसैनिकांनी त्यांना मातोश्रीवर येण्याचे आवाहनही केले. मातोश्रीवर खासदार अरविंद सावंत यांच्या नेतृत्वात आंदोलन छेडले गेले होते. या प्रसंगी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. 32 डिग्री सेल्सिअस तापमानामध्ये या शिवसैनिकांना घाम फुटला होता या रखरखत्या उन्हात राणा दाम्पत्याच्या विरोधात शिवसैनिक घोषणाबाजी करत होते. परंतु दुपारी बारापर्यंत राणा दाम्पत्याचा ठावठिकाणा कोणालाच सापडत नव्हता.
खेरवाडी पोलिसांकडून १४९ ची नोटीस : दुपारी १ च्या सुमारास बातमी आली की खेरवाडी पोलिसांनी रवी राणा यांना त्यांच्या घरी जाऊन 149 ची नोटीस बजावली आहे. यानंतर शिवसैनिक मोठ्या प्रमाणामध्ये राणा यांच्या घराबाहेर गर्दी करू लागले. तसेच रवी राणा यांना बाहेर येण्याचे आव्हान करत होते. वास्तविक त्यांच्या घरापासून दूर अंतरावर पोलिसांनी रस्त्यावर बॅरिकेड्स लाऊन बाहेरील व्यक्तींना तिकडे जाण्यास मज्जाव केला होता. बाहेरील व्यक्तीना त्यांच्या घराकडे जाण्यास बंदी केल्याने राणा दाम्पत्य आपल्या घरात आरामात बसून संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेत होते. तर दुसरीकडे शिवसैनिक भर उन्हात रस्त्यावर राणा दाम्पत्याच्या विरोधात घोषणाबाजी करत होते. त्याचबरोबर राणा दांपत्य आता मातोश्रीवर कधी येणार याची वाट पाहत होते.
पत्रकार परिषदेत संघर्ष पेटवला : दुपारी साडेतीन वाजता रवी राणा यांनी त्यांच्या खार येथील निवासस्थानी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी आपली पुढील भूमिका मांडताना त्यांनी सांगितले की उद्या सकाळी ९ वाजता मातोश्रीवर जाऊन हनुमान चालीसा पठण करणार आहेत. त्या कारणाने आता हा संघर्ष अजून शिगेला पोहोचला आहे. त्यातच कितीही प्रयत्न केला, पोलिसांनी 149 ची नोटीस जरी दिली असली तरी ती झुगारून मातोश्रीवर जाण्याच्या निर्णयावर ते ठाम असल्याने शिवसैनिक त्यांचे मातोश्रीला कशा पद्धतीने स्वागत करतात हे पाहणे गरजेचे आहे. कारण आज सकाळी गनिमी काव्याने अमरावतीहून राणा दांपत्य मुंबईत दाखल झाले. त्याच पद्धतीने उद्या मातोश्रीवर जातील का? अशी शक्यताही वर्तवली जात आहे. त्यासाठी शिवसैनिक रात्रभर मातोश्रीवर पहारा देणार आहेत. त्याचबरोबर पोलीस राणा दाम्पत्याला त्यांच्या निवासस्थानाहून बाहेर पडू देतात का? हे बघणे सुद्धा आता गरजेचे झाले आहे.
हेही वाचा - Rana VS Shivsena : मातोश्रीवर उद्या 9 वाजता हनुमान चालीसाचे पठण करणारच; रवी राणांचा निर्धार