मुंबई - शिवसेनेचे माजी आमदार बाळासाहेब सानप यांनी पुन्हा भाजपचा झेंडा हाती धरला आहे. माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्या उपस्थितीत आज माजी आमदार बाळासाहेब सानप यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
कोण आहेत बाळासाहेब सानप -
सानप भाजपचे नाशिक महापालिकेतील पहिले महापौर राहिले होते. ते भाजपच्या तिकीटावर 2014 साली नाशिक पूर्वमधून आमदार झाले. त्यानंतर 2019 मध्ये राष्ट्रवादीतून विधानसभा निवडणूक लढवली. विधानसभा निवडणुकीत सानप यांचा पराभव झाला, त्यानंतर सानप यांचा शिवसेनेत प्रवेश केला. नाशिक पूर्व भागात सानप यांची मोठी ताकद आहे. गिरीश महाजन यांचे कट्टर समर्थक अशी त्यांची ओळख आहे. नाशिक पालिकेवर भाजपला एकहाती सत्ता मिळवण्यास त्यांची मोठी मदत झाली आहे. त्यांच्या भाजप पक्षप्रवेशाने आगामी नाशिक पालिका निवडणुकीत शिवसेनेला मोठा धक्का बसणार आहे.
यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले, बाळासाहेब सानप यांचे भाजपमध्ये पुन्हा स्वागत आहे. नाशिकमध्ये भाजपच्या वाटचालीत बाळासाहेब यांचे मोठे योगदान आहे. ज्या काळात ते आमच्या बरोबर नव्हते तेव्हा मनाने ते भाजपचेच होते. गैरसमज दूर करून पक्ष मजबूत करण्याकरता काम करावे, यापुढे ३५ वर्षे भाजपमध्ये सानप यांना काम करायचे आहे.
फडणवीस म्हणाले, की काही लोक रोज वावड्या उठवत आहेत, की भाजपचे आमदार आमच्याकडे येणार आहेत, मात्र कोणीही भाजप सोडणार नाही. त्यांच्याकडे अस्वस्थता आहे. त्यांचे त्यांनाच माहीत नाही काय चाललंय ते. त्यांचे आमदार अस्वस्थ आहेत. देशाचे भवितव्य नरेंद्र मोदी यांच्यावर आहे. धोक्याने आलेले सरकार किती दिवस चालणार. माझी इच्छा आहे तिघांनी एकत्र लढावे, ते मोकळी स्पेस सोडणार आहेत आणि त्याचा फायदा भाजपला होणार आहे. या तीन पक्षांनी आपल्याला संधी दिली आहे.
पुन्हा तशाच प्रकारच्या निवडणुकीला सामोरे जायचं आहे -
बाळासाहेब सानप हे शिवसेना, राष्ट्रवादी पक्षात गेले मात्र आपलं घर ते आपलं.. म्हणून ते पुन्हा परतले आहेत. महापालिका निवडणुकीत आपण जोमाने काम केलं. 67 उमेदवार निवडून आले.. त्यात सानप यांचा मोठा वाटा होता. आपल्याला पुन्हा तशाच प्रकारच्या निवडणुकीला सामोरे जायचं आहे. गेल्या वर्षीपेक्षा अधिक नगरसेवक निवडून आणण्यासाठी आपण जोमाने कामाला लागू, असे म्हणत गिरीश महाजन यांनी सानप यांचे स्वागत केले.
भविष्यात पक्षासाठी चांगलं काम करीत राहीन -
गेली 30-35 वर्ष मी कामाला सुरुवात केली. स्थानिक पातळीवर मी स्वतः काम केलं. पक्ष वाढण्यासाठी मी काम केलं. कार्यकर्ते जोडले. फडणवीस यांनी नाशिकसाठी काम केलं. मधल्या काळात थोडा दुरावा आला होता.
त्यामुळे थोडा अस्वस्थ झालो. त्यानंतर मला चंद्रकांत पाटील आणि गिरीश महाजन यांनी मला पुन्हा येण्याचे सुचवले. त्यामुळे पुन्हा पक्षात प्रवेश केला. भविष्यात पक्षासाठी चांगलं काम करीत राहीन, असे बाळासाहेब सानप यांनी प्रवेशानंतर म्हटले.
बाळासाहेब यांना राज्यातील जबाबदारी -
यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले, गिरीश महाजन यांच्यामुळे बाळासाहेब सानप यांचा पुन्हा भाजपात प्रवेश झाला आहे. काही घटनांमुळे बाळासाहेब दुर गेले होते. सत्ता जाऊन १३ महिने झाले आहेत. सत्ताधारी देव पाण्यात ठेवून बसले आहे. आमच्यातून कोणीही जाणार नाही. त्यामुळे त्यांचा मोठा अपेक्षाभंग झालाय. बाळासाहेबांनी आता राज्यात काम करावे त्यांना राज्यातील जबाबदारी देणार आहोत.