मुंबई - भांडुपमधे रस्त्यावर उभ्या असलेल्या ॲक्टिवा गाडीची चोरी करून विकणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीकडून 10 चोरलेल्या ॲक्टिवा जप्त करण्यात आल्या आहेत. हा आरोपी ॲक्टिवा चोरी करून जुन्या गाड्यांचे नंबर प्लेट लावून विक्री करत होता. आरोपी हा मेकॅनिक असून कमी वेळात जास्त पैसे कमावण्यासाठी चोरी करत होता, असे पोलिसांनी सांगितले.
खबऱ्यांच्या माहितीवरून केली अटक -
भांडुप पोलीस स्टेशनमध्ये आलेल्या तक्रारीवरून वरिष्ठ पोलिसांनी एक पथक तयार केले होते. त्यांनी सीसीटीव्ही तसेच आपल्या खबऱ्याकडून माहिती काढली आणि आरोपी किशोर शिर्के याला अटक केली, असल्याचे भांडुप पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्याम शिंदे सांगितले.
डुप्लिकेट चावीने करत असे चोरी -
या आरोपीकडून आतापर्यंत दहा दुचाकी पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत. भांडुपच्या परिसरात राहणारा किशोर शेळके हा मेकॅनिक गेल्या दीड महिन्यांपासून दुचाकी चोरून नकली नंबर प्लेट वापरून शुल्लक किमतींमध्ये गाड्या विकत होता. यासाठी तो निर्जन स्थळावर पार्क केलेल्या दुचाकी हेरत असे आणि हँडल लॉक नसलेल्या दुचाकी डुप्लिकेट चावी वापरून त्या चोरी करायचा.
गाडीची चोरी करताना आरोपी सीसीटीव्हीत कैद -
21 सप्टेंबर रोजी अशाच प्रकारे भांडुपच्या कोकण नगर परिसरातून एक गाडी चोरताना तो सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाला होता. गाडी मालकाने गाडी चोरी झाली असल्याची तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज पाहिले आणि तांत्रिक माहितीच्या आधारावर आणि खबर यांच्या नेटवर्क च्या माध्यमातून त्यांनी शेळके याला ताब्यात घेतलं आणि त्याच्याकडून भांडुप तसेच मुलुंड परिसरातून चोरी केलेल्या दहा दुचाकी देखील हस्तगत केल्या आहेत.
हेही वाचा - बलात्काराचा आरोपी भोंदू बाबाला मुंबई पोलिसांनी गुजरातमधून केली अटक