मुंबई - भंडारा उपजिल्हा रुग्णालयातील आगीचा रिपोर्ट आज येण्याची शक्यता आहे. मात्र, यावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि गरज पडल्यास कॅबिनेटच्याही निदर्शनास आणून देऊ, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. आरोग्यमंत्री राजेश टोपे हे राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयात जनता दरबार उपक्रमासाठी आले असता माध्यमांनी त्यांच्याशी संवाद साधला.
योग्य ती कारवाई -
भंडारा उपजिल्हा रुग्णालय जळीतप्रकरणाचा रिपोर्ट अजून आमच्या विभागाचे सचिव आणि कमिशनर यांच्यापर्यंत आलेला नाही. मात्र, तो आज येईल अशी अपेक्षा राजेश टोपे यांनी व्यक्त केली. या रिपोर्टचा अभ्यास आणि चर्चा आमच्या विभागस्तरावर केली जाईल. रिपोर्टच्या फायन्डींगच्या अनुषंगाने कारवाई केली जाईल. या प्रकरणी दुर्लक्ष करणार्यांना शिक्षा होईलच यात शंका नाही मात्र ही सगळी सिस्टीम दुरुस्त करण्यासाठी ओव्हरअॉल प्रयत्नशील राहू असे आश्वासनही राजेश टोपे यांनी दिले.
काय आहे घटना
9 जानेवारीच्या रात्री अचानक भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातील आऊट बोर्न युनिटमधून धूर निघत असल्याचे समोर आले. कामावर असलेल्या नर्सने दार उघडून बघितले असता त्या रूममध्ये मोठ्या प्रमाणात धूर दिसून आला. त्यामुळे त्यांनी लगेच दवाखान्यातील अधिकाऱ्यांना सांगितले. त्यानंतर अग्निशामक दल घटनास्थळी पोहोचून दवाखान्यातील लोकांच्या मदतीने बचावकार्य सुरू केले. आगीवर तातडीने नियंत्रण मिळवले गेले. मात्र तरीही धुर मोठ्या प्रमाणात होता. या दुर्घटनेत 10 नवजात बालकांचा मृत्यू झाला. तर, सात बालकांना वाचवण्यात यश आले.
७ बालकांना वाचवण्यात यश
या विभागामध्ये आऊट बोर्न आणि इन बोर्न अशी दोन युनिट आहेत. यापैकी इन बोर्न मधील असलेले सात बालके सुखरूप आहेत. तर आऊट बोर्न युनिटमधील 10 बालंकांचा मृत्यू झाला. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सकांनी सांगितले. आग लागली तेव्हा रूग्णालयात अन्य रूग्ण ही मोठ्या प्रमामात होते. त्यांना तातडीने सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आल्याचे ही जिल्हा शल्य चिकित्सकांनी सांगितले.
हेही वाचा - 'तांडव' वेब सीरीज प्रकरणी यूपी पोलिसांचे तपास पथक मुंबईत दाखल
हेही वाचा - माणुसकीला काळीमा..! नांदेडात डुकराने तोडले मृतदेहाचे लचके