मुंबई - मुंबईची लाईफलाईन असलेली 'बेस्ट' आर्थिक संकटात आहे. मात्र गेल्या काही वर्षांत बेस्टने प्रवाशांना उपलब्ध करून दिलेल्या सुविधा आणि डिजिटलायझेशन यामुळे प्रवासी संख्या आणि महसुलात वाढ झाली आहे. गेल्या वर्षभरात बेस्टच्या सहा लाख प्रवाशांची तर महसुलात एक कोटी रुपयांहून अधिकची वाढ झाली आहे.
कमी दरात आरामदायी प्रवास - मुंबई महापालिकेच्या बेस्ट उपक्रमाकडून परिवहन सेवा दिली जाते. बेस्ट उपक्रम गेल्या काही वर्षापासून आर्थिक संकटात आहे. बेस्टला चार हजार कोटींहून अधिकचा तोटा झाला आहे. बेस्टला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी तत्कालीन पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी कृती आराखडा दिला. खर्च कमी करताना उत्पन्न वाढवण्याचे आदेश बेस्टला दिले. त्यावेळी बेस्टने 5, 10, 15 आणि 20 रुपये इतके तिकीट दर केले. बेस्टने भाडेतत्वावर खासगी एसी बसेस कंत्राटी पद्धतीने आणल्या. स्वस्त आणि एसी आरामदायी प्रवास करायला मिळत असल्याने बेस्टचे प्रवासी वाढू लागले. त्याचप्रमाणे महसुलातही वाढ होऊ लागली.
वन नेशन वन कार्ड - प्रवाशांची संख्या वाढू लागल्यावर 'चलो अॅप आणि स्मार्ट कार्ड' काढले आहे. जानेवारीमध्ये या ऍप आणि कार्डचे लोकार्पण पर्यावरण व मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. आतापर्यंत एकूण 62 हजार प्रवाशांनी हे ऍप डाऊनलोड केले आहे. सध्या प्रवास करणाऱ्या 30 लाख प्रवाशांपैकी बहुसंख्य प्रवाशांनी चलो ऍपचे स्मार्ट कार्ड खरेदी केले आहे. तसेच नुकतेच बेस्टने 'वन नेशन वन कार्ड' (कॉमन मोबिलिटी कार्ड) प्रवाशांच्या सोयीसाठी आणले आहे. यामुळे प्रवाशांना एकाच कार्डवर बेस्ट, रेल्वे, मेट्रो, मोनो ने प्रवास करता येणार आहे, अशी माहिती बेस्टचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्र यांनी दिली.
प्रवासी आणि महसूलात वाढ - कोरोना काळात बेस्टने 10 ते 12 लाख प्रवासी प्रवास करत होते. 1 एप्रिल 2021 रोजी प्रवासी संख्या 23 लाख 40 हजार 968 होती. त्यावेळी रोजचे उत्पन्न 1 कोटी 78 लाख 45 हजार 754 इतके होते. एप्रिल 2022 ला प्रवासी संख्या 29 लाख 63 हजार 754 वर पोहचली असून रोजचा महसूल 2 कोटी 83 लाख 5 हजार 513 वर पोहचला आहे. गेल्या वर्षभरात साडेसहा लाख प्रवासी आणि एक कोटी चार लाख रुपयांची वाढ झाली आहे. सध्या बेस्टची प्रवासी संख्या सुमारे 30 लाख असून 3 कोटी रोजचा महसुल आहे, अशी माहिती महाव्यवस्थापकांनी दिली.
चलो अॅप, चलो स्मार्ट कार्डचा फायदा - चलो ऍप आणि चलो स्मार्ट कार्डच्या माध्यमातून प्रवाशांना प्रवासी भाड्यासह प्रवासाच्या ठिकाणापर्यंत ठराविक अंतराच्या अनुषंगाने बस पासची निवड करण्याची सुविधा देण्यात आली आहे. एका दिवसापासून 84 दिवसांपर्यंत आणि दोन फेऱ्यांपासून 150 फेऱ्यांपर्यंत पर्याय देण्यात आले आहेत. ऍपच्या माध्यमातून पास आणि तिकीट काढता येते. तसेच चलो ऍपचे 70 रुपयांचे स्मार्ट कार्ड प्रवाशांना देण्यात येते. या कार्डच्या माध्यमातून पास, तिकीट काढता येणार आहे. या कार्डमध्ये दहा रुपये पासून 3 हजार रुपयापर्यंत कितीही रक्कम रिचार्ज करता करता येते. हे कार्ड डेपो आणि कंडक्टरकडे उपलब्ध करून देण्यात आले असल्याने प्रवाशांना ते सहज उपलब्ध होते, अशी माहिती बेस्ट उपक्रमाकडून देण्यात आली आहे.
हेही वाचा - IIM Nagpur : राष्ट्रपतींच्या हस्ते आयआयएमच्या भव्य इमारतीचे उद्घाटन
बसचे लोकेशन कळते - बेस्टच्या स्टॉपवर उभे राहून प्रवाशांना बसची तासन-तास वाट बघावी लागते. यामुळे प्रवासी रिक्षा, टॅक्सी, ओला, उबेर आदी खासगी वाहनांचा आधार घेत प्रवास करत होते. बेस्टने प्रवाशांना चांगल्या सुविधा देण्यासाठी डिजिटल होण्याचा निर्णय घेतला आहे. बेस्टने सुरू केलेल्या चलो ऍपमुळे बस सध्या कुठे आहे, स्टॉपवर ती किती वेळात येईल आदी माहिती प्रवाशांना मिळत आहे. त्याचप्रमाणे बसमध्ये किती गर्दी आहे, बसण्यासाठी किती जागा शिल्लक आहेत आदी माहिती समजते. यामुळे प्रवाशांचा प्रवास सोपा झाला आहे. प्रवाशांना डिजिटल आणि आरामदायी प्रवास करायला मिळत असल्याने प्रवासी बेस्टवर खुश आहेत. यामुळे प्रवाशी संख्या आणि महसुलात वाढ झाली आहे, अशी प्रतिक्रिया माजी विरोधी पक्षनेते व माजी बेस्ट समिती सदस्य रवी राजा यांनी दिली आहे.
हेही वाचा - Wedding Vows In front Wax Statue : मृत वडिलांच्या मेणाच्या पुतळ्यासमोर वराने घेतली लग्नाची शपथ