मुंबई - शहरातील काही परिसरात वीज चोरी करुन वापरली जात असल्याचे उघड झाले आहे. बेस्टकडून वीज चोरी पकडण्यासाठी जानेवारी २०२० ते एप्रिल २०२२ पर्यंत २५३३ वीज चोरी प्रकरणे उघडकीस आणली आहेत. या प्रकरणी तब्बल ६ कोटी ९९ लाख रुपये दंड बेस्टने वसूल केला आहे. मुंबई शहरातील नागरिकांनी वीज चोरी करून वापरू नये, अधिकृत वीज मीटर लावून वीज वापरण्याचे आवाहन बेस्ट प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
वीज चोरांवर बेस्टची धडक कारवाई - सर्वात स्वस्त व अखंडित वीजपुरवठा करण्याचे कर्तव्य बेस्ट उपक्रमाच्या विद्युत विभागातील कर्मचारी बजावतात. बेस्ट उपक्रमाच्या विद्युत विभागाच्या माध्यमातून मुंबई शहरातील १० लाख वीज ग्राहकांना वीजपुरवठा करण्यात येतो. तर वीजेची अनधिकृत जोडणी कायद्याने गुन्हा असून दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा बेस्ट उपक्रमाच्या विद्युत विभागाकडून वेळोवेळी दिला जातो. तरीही अनधिकृत वीज जोडणी घेतल्याचे प्रकार उघडकीस येतात. अनधिकृत वीज जोडणी घेणाऱ्यांवर दक्षता विभागातील अधिकारी कारवाई करतात. मुंबईत झोपडपट्टी भागात अनधिकृत वीज मीटर घेऊन वीज वापरली जात असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यामुळे बेस्ट उपक्रमाच्या दक्षता विभागातील अधिकाऱ्यांनी संबंधित ठिकाणी छापा टाकला. छाप्यादरम्यान या ठिकाणी चोरीची वीज वापरली जात असल्याचे स्पष्ट झाले.
दोन वर्षात वसूल केला ६.९९ कोटींची दंड - जानेवारी २०२० ते एप्रिल २०२२ या कालावधीत २५३३ वीज चोरीची प्रकरणे उघडकीस आली. त्यांच्याकडून ६ कोटी ९९ लाख रुपयांची दंड वसुली करण्यात आली आहे. अनधिकृत वीज जोडणी कायद्याने गुन्हा असून यामुळे शार्ट सर्किटची घटना घडत आग लागण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे वीज ग्राहकांनी अधिकृत वीज जोडणी घेत स्वतःच्या व इतरांच्या जीवाची काळजी घ्यावी, असे आवाहन बेस्ट उपक्रमाच्या माध्यमातून वीज ग्राहकांना करण्यात आले आहे.