मुंबई - नायगाव बीडीडी चाळ पुनर्विकासातील रखडलेले पात्रता निश्चितीचे काम पुन्हा सुरू करण्याचा निर्णय म्हाडाच्या मुंबई मंडळाने घेतला आहे. त्यानुसार पुढील आठवड्यात येथे उपजिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून सर्व्हेक्षण सुरू होणार आहे. मात्र हे सर्व्हेक्षण सूरु होण्याआधीच वादात अडकले आहे. कारण राजू वाघमारे यांच्या रहिवासी संघटनेने या सर्व्हेक्षणाला विरोध केला आहे. कोणत्याही परिस्थितीत सर्व्हेक्षण होऊ दिले जाणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. त्यामुळे सर्व्हेक्षणाचे काम पुन्हा रखडण्याची शक्यता आहे.
नायगाव प्रकल्पातील काही रहिवाशांचा पात्रता निश्चिती प्रक्रियेला आणि सर्व्हेला विरोध आहे. त्यामुळे गेल्या 3 वर्षात सर्व्हेचे काम पुढे गेलेले नाही. परिणामी प्रकल्प रखडल्याने कंत्राटदार एल अँड टी कंपनीनेही कंटाळून माघार घेतली आहे. पण राज्य सरकारसाठी हा प्रकल्प महत्वाकांक्षी असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रकल्पातील सर्व अडथळे दूर करत कामाला वेग द्या, असे आदेश म्हाडाला दिले आहेत. त्यानुसार आता म्हाडाने एकीकडे एल अँड टीची विविध माध्यमातून मनधरणी सुरू केली आहे. तर दुसरीकडे पात्रता निश्चितीच्या कामाला पुन्हा सुरूवात केली आहे. त्यानुसार नायगाव बीडीडी चाळीत रहिवाशांना नोटीस पाठवत 5 ऑक्टोबरपासून सर्व्हेक्षण होणार असून अधिकाऱ्यांकडे कागदपत्रे जमा करण्याची विनंती केली आहे.
या सर्व्हेला वाघमारे यांनी आणि त्यांच्या संघटनेने विरोध केला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडे सर्व रहिवाशांची अधिकृत माहिती आहे. आम्ही त्यांना भाडे भरतो. जितकी घरे चाळीत आहेत, तितकेच रहिवासी आहेत. झोपडीला अनेक दरवाजे दाखवत एकाची दोन घरे दाखवता येत नाहीत. तेव्हा सर्व्हेची गरज काय असे म्हणत पुढच्या आठवड्यात कोणत्याही परिस्थितीत सर्व्हे होऊ दिला जाणार नाही असा इशारा वाघमारे यांनी दिला आहे. कुणीही अधिकाऱ्यांना कागदपत्रे देऊ नयेत असे आवाहन वाघमारे यांनी रहिवाशांना केले आहे. तर आधी रहिवाशांबरोबर करार करावा, जेणेकरून त्यांना हक्काच्या घराची हमी मिळेल. हा करार झाला तरच आम्ही पुनर्विकास होऊ देऊ असेही त्यांनी सांगितले आहे. त्यांच्या या इशाऱ्यामुळे प्रकल्पात पुन्हा अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे. दरम्यान यावर म्हाडाच्या मुंबई मंडळाने मात्र काहीही बोलण्यास नकार दिला आहे.
सर्व्हे व्यवस्थित पार पडेल -
वाघमारे यांनी सर्व्हेला विरोध केला आहे. सर्व्हे हाणून पडण्याचा इशारा दिला असला तरी नायगाव मधील मोठ्या संख्येने रहिवासी पुनर्विकासाच्या म्हणजेच सर्व्हेच्या बाजूने आहेत. त्यामुळे सर्व्हे व्यवस्थित पार पडेल असा विश्वास येथील रहिवासी लक्ष्मण देसनेरे यांनी व्यक्त केला आहे.