मुंबई - राज्यसभा निवडणुकीच्या आखाड्यात ( Rajyasabha Election 2022 ) आता सात उमेदवार असल्याने घोडेबाजार होणार, असा तर्क-वितर्क लढवला जातो आहे. यात काही प्रमाणात तथ्य असले तरी प्राधान्यक्रमाची मते कुणाला मिळतात, यावरच सहावी जागा निवडून येणार आहे. एकाच पक्षाकडे असणाऱ्या मतांची संख्या पाहिल्यास भाजपाला संधी अधिक असल्याचे जाणकार सांगतात.
राज्यसभा निवडणुकीचे मतदान हे पसंती क्रमाचे म्हणजेच प्रेफरन्शियल मतदान असते. पहिल्या पसंतीच्या उमेदवारांच्या नावापुढे एक क्रमांक टाकायचा आणि दुसऱ्या तिसऱ्या पसंतीच्या उमेदवाराच्या नावापुढे दोन आणि तीन क्रमांक टाकायचे, अशा पद्धतीने मतदान करावे लागते. पक्षातील आमदारांसाठी मतदान दाखवून करावे लागते. त्यामुळे पक्षातील मध्ये फुटणार नाही, असा दावा सर्व पक्ष करत आहेत. वास्तविक पक्षाने या निवडणुकीसाठी जरी व्हीप जारी केला तरी विरोधात जाणाऱ्या आमदारावर कारवाई करता येत नाही, असेही म्हटले जाते. त्यातच अपक्ष आमदारांवर मत दाखवण्याची सक्ती नाही, किंबहुना जर त्यांनी मत दाखवले तर त्यांचे मतच बाद होते. त्यामुळे त्यांना मत दाखवणे बंधनकारक नाही आणि तिथेच दगाफटका होऊ शकतो. घोडेबाजाराला वाव आहे, असे म्हटले जाते.
काय असते मतांची प्रक्रिया? - राज्यसभेच्या उमेदवाराला निवडून येण्याकरिता 42 मतांचा कोटा ठरला आहे. मात्र, ही 42 मते म्हणजे या मतांचे मूल्य 4200 इतके आहे. एका मताला शंभर मूल्य दिलेले आहे. जर, एखाद्या उमेदवाराला 4200 पेक्षा कमी मूल्य असेल, तर त्याला ते पूर्ण करण्यासाठी पुढच्या फेरीत झगडावे लागते. सहा उमेदवार निवडून येणार असल्याने सातवा उमेदवार बाद होईपर्यंत, या फेर्या सुरू राहतात, अशी माहिती ज्येष्ठ राजकीय विश्लेषक अनिकेत जोशी यांनी दिली.
पसंती क्रमाच्या मतांचे महत्व - जेव्हा नियोजित जागांपेक्षा मतदार अधिक असतात, तेव्हा मतमोजणीची प्रक्रिया अधिक गुंतागुंतीची होते दूसर्या आणि तिसर्या पसंतीची मते मोजली जाऊ शकतात. सात उमेदवारांमध्ये ज्या उमेदवाराला सर्वाधिक पहिल्या पसंतीची मते पडतात तो प्रथम विजयी घोषित होतो. त्याची दुसऱ्या पसंतीची मते आधी मोजली जातात. म्हणजे एखाद्या उमेदवाराला सर्वाधिक 60 मते असतील तर तो सर्वात प्रथम विजयी घोषित होतो. तसेच, त्याची उर्वरित 18 मते ही 100% मूल्याने दुसऱ्या पसंतीच्या उमेदवाराला वर्ग केली जातात. उदाहरणार्थ संजय राऊत यांना सर्वाधिक मते मिळाली आणि दुसऱ्या पसंतीची मते जर संजय पवार यांना अधिक असतील तर ती मते त्यांच्याकडे वर्ग केली जाऊ शकतात. मग, संजय पवार पुढे येऊ शकतात, असेही जोशी म्हणाले.
अधिक मते मिळाल्यास काय असेल गणित? - राऊत यांच्या प्रमाणे जर पियुष गोयल आणि धनंजय महाडिक यांनाही 50 पेक्षा अधिक मते पहिल्या पसंतीची मिळाली, तर त्यांची दुसऱ्या पसंतीची उर्वरित मते तिसऱ्या आणि चौथ्या फेरीत मोजली जातात. मात्र, त्या मतांचे मूल्य शंभर टक्के धरले जात नाही. तिसऱ्या फळीतील मतांचे मूल्य 75 टक्के तर चौथ्या फेरीत 50 टक्के असे कमी होत जाते. त्यामुळे चार हजार 200 चा आकडा गाठण्यात उमेदवारांची दमछाक होते.
भाजपाला का आहे संधी? - भारतीय जनता पक्षाकडे विधानसभेत स्वतःचे 105 आणि सहयोगी पक्षांचे सहा असे मिळून 113 मते आहेत, असे मानले जाते. पियुष गोयल आणि डॉक्टर अनिल बोंडे यांना कोट्यापेक्षा अधिकची मते भाजपा देऊन त्यांची दुसऱ्या पसंतीची मते आधी मोजली जातील अशी व्यवस्था करू शकते. कारण त्यांच्याकडे इतर पक्षांपेक्षा मतांची संख्या जास्त आहे. तसे झाल्यास महाडिक यांच्या विजयाची शक्यता अधिक निर्माण होते. शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांची मते कोट्यापेक्षा अधिक पण गोयल आणि बोंडे यांच्या पेक्षा कमी असतील तर त्यांची दुसऱ्या क्रमांकाची मते ही चौथ्या आणि पाचव्या फेरीत मोजली जातील. त्यांचे मत मूल्यही कमी होणार, त्यामुळे त्याचा लाभ आपसूकच भाजपच्या उमेदवाराला होऊ शकतो, असेही जोशी यांनी सांगितले.
पसंती क्रमांच्या अभ्यासानुसारच मतदान - राज्यसभेच्या निवडणुकीत उमेदवार निवडून येईल, याची तजवीज भाजपा करीत आहे. आमच्यासोबत अपक्ष असल्याने आमची ताकद वाढलेली आहेच. आमच्याकडे दोन उमेदवार निवडून आणण्याची ताकद आहे. तिसऱ्या उमेदवारासाठी 10 मते कशी मिळवायची हे आम्हाला चांगले ठाऊक आहे. पसंतीक्रमाच्या गणितात आम्ही नक्की बाजी मारु, असा विश्वास भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला आहे.
यांच्या मतांवर विजयाची गणिते - सहाव्या उमेदवाराचा विजय निश्चित करण्यात २९ आमदार महत्त्वाचे आहेत. यातील काहीजण सत्ताधारी गटातील आहेत. तर, काही विरोधातील दोन्ही गटात नसलेले 13 आमदार महत्त्वाचे आहेत.
बहुजन विकास आघाडी - ३
समाजवादी पार्टी - २
एमआयएम - २
प्रहार जनशक्ती - २
मनसे - १
माकप - १
शेकाप - १
स्वाभिमानी - १
राष्ट्रीय समाज पक्ष - १
जनसुराज्य शक्ती पक्ष - १
क्रांतिकारी शेतकरी पक्ष - १
हेही वाचा - Home brewery closed : घरपोच मद्यविक्री बंद, राष्ट्रवादी शिवसेनेलाच मते देणार : उपमुख्यमंत्री अजित पवार