मुंबई गणपती बाप्पाची जेवढी विविध रूपे तेवढ्याच त्याच्या रंजक कथा. पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करण्याचं आवाहन देशभरात मागील अनेक वर्षापासून केले जात आहे. महत्त्वाचं म्हणजे अनेकभक्तगण त्याला चांगला प्रतिसादही देत आहेत. असेच एक पिळणकर कुटुंब (Pilankar family) आहे, जे मागील ७६ वर्षापासून घरात उजव्या सोंडेच्या बाप्पाची स्थापना (Bappa of Right trunk) करून पूजा अर्चा करत आले आहेत. दरवर्षी विविध चलचित्रांच्या माध्यमातून पौराणिक देखावे सादर केले जातात. विशेष म्हणजे या गणपती बाप्पाचे विसर्जन केले जात नाही. दरवर्षी एकच मूर्ती गणेश चतुर्थीला पुजली जाते व अनंत चतुर्थीला उत्तर पूजा करून पुन्हा येणाऱ्या संकष्टीला त्याची मंदिरात स्थापना केली जाते. व ही परंपरा अखंड नित्यनियमाने मागील ७६ वर्षापासून सुरू (76 years of tradition) आहे.
काय आहे मागचा इतिहास ? या गणपती बाप्पाच्या मुर्तिविषयी बोलताना पिळणकर कुटुंबातील तिसऱ्या पिढीचे कर्ते ज्यांच्या घरी आता गणपती बाप्पा विराजमान होतात, ते दिलीप मधुसूदन पिळणकर सांगतात की, १९४६ साली त्यांचे आजोबा सीताराम पिळणकर यांना ही मूर्ती मे महिन्यात मुंबईला, दादर येथे समुद्रात पोहताना भेटली. ते स्वतः पुजारी असल्याकारणाने त्यांनी ती मूर्ती त्या वर्षी घरी आणली. त्यावर्षी गणेश चतुर्थीला मूर्तीची स्थापना करून अनंत चतुर्थीला त्याचे विसर्जन करायचे त्यांनी ठरवले, अशा पद्धतीने त्यांनी त्या वर्षी पूजा अर्चा केली व त्यावर्षी दुसऱ्या दिवशी अनंत चतुर्थी असताना आदल्या दिवशी त्यांना स्वप्नात दृष्टांत झाला की, "मी तुला बाहेर पाण्यात सापडलो आहे, पुन्हा मला बाहेर सोडू नको! मला तुझ्याकडून काही अपेक्षा नाही, फक्त माझी पूजाअर्चा कर," असा दृष्टांत त्यांना झाला व तेव्हापासून ह्या मूर्तीची पूजा दरवर्षी नित्य नियमाने होत आली आहे.
सिताराम पिळणकर यांच्यानंतर त्यांचा मुलगा मधुसूदन पिळणकर व आता मधुसूदन यांचा मुलगा दिलीप पिळणकर या तिसऱ्या पिढीकडे गणपतीची स्थापना केली जाते. अतिशय भक्ती भावाने दरवर्षी मोठ्या उत्साहात संपूर्ण पिळणकर कुटुंब एकत्र येऊन गणपतीची पूजा करण्याबरोबरच इथे चल चित्राच्या माध्यमातून दरवर्षी विविध पौराणिक कथांचे देखावे सादर केले जातात. जय गणेश भक्तांना मोठ्या प्रमाणात आवडतात.
यंदाचे वैशिष्ट्य यंदाचे हे ७६ वे वर्ष असून (76 years of tradition) यंदा त्रिपुरा राक्षस वधाचा देखावा चलचित्राच्या माध्यमातून साकारण्यात आला आहे. भगवान शंकर त्रिपुरा राक्षसाचा वध करतात असा हा पौराणिक देखावा साकारण्यात आला असून भक्तगण मोठ्या उत्साहाने तो पाहताना दिसून येत आहेत. त्याचबरोबर ही मूर्ती उजव्या सोंडेची असल्याकारणाने सिद्धिविनायक बाप्पा असेही या मूर्तीला संबोधले जाते. वर्षानुवर्षे चालत आलेली परंपरा पिळणकर कुटुंबीयांनी आतापर्यंत चालू ठेवली असून यामध्ये कधीही खंड पडू दिला नाही. तर दोन वर्षांनी या मूर्तीला रंग दिला जातो. मूर्तिकार राजेश हजारे हे या मूर्तीला रंग देण्याचे काम करतात. यापूर्वी त्यांचे वडील या मूर्तीला रंग देत असत. कारण उजव्या सोंडेच्या गणपतीची मूर्ती असल्याने सर्वच मूर्तिकार अशा मुर्त्यांना रंग देत नाहीत.
काय म्हणतात भक्तगण ? मागील ४० वर्षा पेक्षा जास्त वर्षापासून नित्यनियमाने गणपती बाप्पाची पूजा करणाऱ्या कुसुम मिश्रा म्हणतात की, आम्ही फार गरीब होतो. आमची परिस्थिती फारच हालाखीची होती. पण माझी या बाप्पावर फार श्रद्धा, माझ्या लग्नापासून मी या गणपतीची पूजाअर्चा दरवर्षी नित्य नियमाने करत आली आहे. आता माझी पाच अपत्य असून ती सर्व व्यवस्थित शिकली असून ती सर्व योग्य त्या ठिकाणी कामधंद्याला आहेत. हे सर्व बाप्पाच्या कृपेने शक्य झाले आहे.आमचा या बापावर पूर्ण विश्वास असून याची पूजा करण्यासाठी आम्ही दरवर्षी त्यामध्ये कधीच खंड पडू देत नाही.
हेही वाचा Ganeshotsav 2022: कोल्हापूरात शांततेत गणेश विसर्जन; 180 ठिकाणी पर्यावरणपूरक गणेश विसर्जन कुंड