मुंबई - सीएसएमटी येथे गुरुवारी पादचारी पूल कोसळला त्या घटनेत पुलावर गेले १५ वर्ष केळे विक्री करणारा ३२ वर्षीय विक्रेता जखमी झाला आहे. आत्माराम येडगे असे त्यांचे नाव असून त्यांच्यावर जीटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
आत्माराम हे दुर्घटनाग्रस्त पुलावर दररोज संध्याकाळी ५ ते ८ या वेळेत केळी विकत असत. कालच्या घटनेत ते पुलावरून खाली कोसळले आणि यात त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. घटनेपूर्वी त्यांचा भाचा निलेश या पुलावरून गेला होता, यामुळे तो बचावला.
आत्माराम यांच्यासोबत भेळ, प्लास्टिक बॅग विक्रेते देखील त्या पुलावर बसत होते. मात्र, ते पूलाच्या दुसऱ्या भागात बसत असल्याने वाचले. आम्हाला आमच्या भावाची माहिती व्हाट्सअपवर आली आणि तात्काळ आम्ही जीटी रुग्णालयात धाव घेतली, असे त्यांचा भाऊ सुरेश येडगे यांनी सांगितले.