मुंबई - गट-तट हा माझा विषय नाही. मी संबंध ठेवतो, तुम्हीही तसेच ठेवा वेळ कठीण आहे, त्यामुळे मनातील मतभेद काढून टाका, असे आवाहन काँग्रेसचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केले. आपणच भाजपला पराभूत करू शकतो अशी प्रतिज्ञा करून कामाला लागा, असे देखील ते म्हणाले. नरिमन पॉईंट येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे गुरुवारी काँग्रेसने नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष आणि कार्याध्यक्षांचा पदभार स्वीकारण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यावेळी थोरात यांनी काँग्रेस नेत्या रजनी पाटील यांनी केलेल्या एका वक्तव्यावर हे आवाहन केले.
रजनी पाटील यांनी आपल्या भाषणात 'बाळासाहेब तुम्ही गटातटाचे राजकारण करणार नाही, एवढा विश्वास आहे', असे वक्तव्य केले होते. त्यावर थोरात यांनी गट-तट हा माझा विषय नसल्याचे सांगितले. राज्यात पुन्हा एकदा काँग्रेस- राष्ट्रवादीची सत्ता येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. १९८० मध्ये काँग्रेस पुन्हा सत्तेत आली होती, तशी आवृत्ती होईल आणि अनेक जण काँग्रेसचे जुने बिल्ले काढून प्रचार करण्यासाठी समोर येतील असेही ते म्हणाले.
सध्या राज्यात आणि देशातही वेळ कठीण असून धर्मनिरपेक्ष ताकद वाढवायची आहे. लोकशाही धोक्यात आली आहे, त्यामुळे आपण पुढे येऊन काम केले पाहिजे. राज्यात जिथे संधी मिळेल तिथे युवकांना संधी दिली जाईल. सध्या सर्वात महत्त्वाची जबाबदारी ही एनएसयुआय या संघटनेवर आहे. महाविद्यालयीन निवडणुका होणार असल्याने त्यांच्यासोबत संवाद साधला पाहिजे. आपल्याकडे शाश्वत विचार आहे, त्या विचारावरच आपण भाजपाला हारवू शकतो. गेल्या काही वर्षात आम्ही खूप काम केले, त्यातून यश आले नाही. मात्र, लोकसभेला लोक वेगळा निर्णय देतात, ही बाब लक्षात ठेवली पाहिजे. त्यामुळेच आम्ही विधानसभेची निवडणूक बॅलेट पेपरवर घेतल्या पाहिजे यासाठी आग्रही आहोत.
राज्यातील मागील पाच वर्षांत शेतकरी अडचणीत सापडला आहे, त्याची अजूनही खरचं कर्जमाफी झालेली नाही. स्थिती काय आहे?, राष्ट्रीय बँकांनी केवळ सात टक्के कर्ज माफी दिली आहे. त्यामुळे आपल्याला शेतकऱ्याला सोबत घेण्याचे काम करावे लागेल. व्यापार कमी झाला, कारखानदारी कमी झाली, बाजारपेठेत मंदी दिसतेय. अशा स्थितीत ढोंग करण्यासाठी सेनेच्या लोकांनी काल वांद्र्यात मोर्चा काढला होता. मात्र, याच लोकांनी सत्ता येताच विमा पद्धत बदलली. त्यामुळे त्यांचे आमदार विधीमंडळात का बोलले नाहीत, असा सवालही त्यांनी केला.
पक्षाला काही जण सोडून जातात त्यामुळे जागा रिक्त होतात. काही जण पक्षाला सोडून गेले म्हणून आता नव्या जागा तयार झाल्या. त्यामुळे तरुणांनी आता या जागा धराव्यात. कॉंग्रेसचा विचार हा शाश्वत आहे. मात्र, भाजपचे लोक देशात एक पक्षीय सत्ता आणतील, अशी भीती देखील थोरात यांनी व्यक्त केली. पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी राहुल गांधी यांनीच राहावे, अशी मागणी या कार्यक्रमातील उपस्थित सर्वांनी हात वर करून केली.