मुंबई - सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरभरतीमध्ये दिलेले आरक्षण रद्द झाल्याने समाज संतप्त झालेला आहे. त्यामुळे राज्य सरकारचाविरोधात मराठा समाज आता मुंबईत जनजागृती बाइक रॅली काढणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही बाइक रॅली शासनाच्या नियमानुसार काढण्यात येणार आहे, अशी माहिती मराठा क्रांती मोर्चाचे राजन घाग यांनी दिली आहे.
'२७ जूनला काढणार बाइक रॅली' -
मराठा क्रांती मोर्चाचे राजन घाग यांनी सांगितले की, आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षणाचा कायदा सर्वोच्च न्यायालयात रद्द झाल्याने मराठा समाजात मोठा असंतोष आहे. मुंबई विभागीय बैठकीत हा असंतोष व्यक्त झाला आणि मुंबईत मराठा समाजाचे आंदोलन करणे आवश्यक असल्याचे एकमताने ठरले. सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर उद्भवलेली परिस्थिती, मराठा समाजाच्या इतर मागण्यांची सद्यस्थिती आणि त्यावर करावयाच्या उपाययोजना याबाबत समाजात जागृती आणणे आवश्यक आहे. त्यामुळे लॉकडाऊन संपताच सरकारचे मराठाविरोधी धोरण आणि आरक्षण टिकविण्यासाठी केलेले अपुरे प्रयत्न याचा निषेध करण्यासाठी आम्ही मुंबईत मराठा समाजातर्फे २७ जून २०२१ला बाइक रॅली काढण्यात येणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही बाइक रॅली शासनाच्या नियमानुसार काढण्यात येणार आहे,
'सरकारला हादरवून सोडणार' -
मराठा क्रांती मोर्चाचे राज्यभरात सुमारे ६० मोर्चे निघाले. प्रत्येक जिल्ह्यातील समन्वयकांनी त्यांच्या त्यांच्या जिल्ह्यात मोर्चे काढले. मुंबई येथे राज्यभरातील सर्व जिल्ह्यातील मराठा समाजाने महामोर्चा काढला. मात्र, आजवर मुंबई जिल्ह्याचा मोर्चा निघाला नाही. २७ जूनला निघणारी बाइक रॅली समाजात जागृती आणणारी ठरेल आणि त्यानंतर निघणारा राज्यभरातील मराठा समाजाचा महामोर्चा सरकारला हादरवून सोडल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही राजन घाग यांनी दिला.
'समितीवरून चव्हाणा हटवा' -
आघाडी सरकारच्या नाकर्तेपणावर मराठा समाज संतप्त आहे. न्यायालयात आरक्षण टिकावे म्हणून हे सरकार निष्क्रिय असल्याचेच दिसून आले आहे. त्यामुळे या सरकारच्या भूमिकेविषयी सुरुवातीपासूनच संशय होता. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयातून ते सिद्धच झाले. मराठा आरक्षणासंदर्भात नियुक्त केलेल्या उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दीड वर्षात काहीही केलेले नाही. मराठा समाजाविषयी त्यांना आस्थाच नाही. सर्वोच्च न्यायालयात आपण सर्व तयारीनिशी बाजू मांडणार असे म्हणणारे चव्हाण तेथे तयारीसाठी मुदत मागून घेतात, यातच त्यांच्या हेतूविषयी शंका घण्यास वाव आहे. त्यामुळे चव्हाण यांची या उपसमिती अध्यक्षपदावरून उचलबांगडी करावी आणि तेथे अजित पवार किंवा एकनाथ शिंदे यांची नियुक्ती करावी अशी मागणी राजन घाग यांनी मुंबई मराठा समाजाच्या वतीने केली आहे.