मुंबई - एक वर्षाहून अधिक काळ भारतात आणि जगात कोरोनाचे सावट कायम आहे. या काळात माणुसकीला काळीमा फासणाऱ्या अनेक घटना घडल्या. त्याचप्रमाणे माणुसकीवरचा विश्वास घट करणारे अनेक देवदूही दिसले. याचेच एक उदाहरण म्हणजे आज (गुरुवार) चेंबूर मधील गणेश नगर येथे 'ऑटो रुग्णवाहिका' ही योजना सुरू केली. ऑटोमध्ये ऑक्सिजन सिलेंडर लावून ही ऑटो रुग्णवाहिका सुरू करण्यात आली आहे.
चार ऑटो रुग्णवाहिका प्रदान
ऑल इंडिया मेमन जमात फेडरेशन या सामाजिक संस्थेच्यावतीने मुंबईमध्ये अनेक ठिकाणी कोरोना काळात विविध सामाजिक उपक्रम राबवले गेले. या संस्थेने चेंबूर, मानखुर्द, गोवंडी आणि कुर्ला या ठिकाणच्या लोकांसाठी ऑटो रुग्णवाहिका सेवा सुरू केली आहे. या उपक्रमाचे उद्घाटन आज चेंबूरच्या स्थानिक नगरसेविका आशाताई मराठे यांच्या हस्ते झाले. यावेळी ऑल इंडिया मेमन जमात फेडरेशनचे चेअरमन हाजी इक्बाल तसेच स्पोर्ट विंग चेअरमन असिफ जुमा यासह अन्य कार्यकर्तेही उपस्थित होते. मानखुर्द, गोवंडी, चेंबूर आणि कुर्ला या चार ठिकाणसाठी चार ऑटो रुग्णवाहिका ऑल इंडिया मेमन जमात फेडरेशनतर्फे देण्यात आलेले आहे.
मोफत सेवा मिळणार -
शहरातील कुर्ला, गोवंडी, मानखुर्द झोपडपट्टी सारख्या ठिकाणी मोठ्या रुग्णवाहिका आत जात नाही. तसेच येथील लोकांना तातडीने रुग्णवाहिका उपलब्ध होत नाहीत. मात्र आतील लहान-लहान चाळीमध्ये ऑटो आतमध्ये जातात. त्यामुळे रुग्णांना त्याची खूप मोठी मदत होईल. कोरोना रुग्णांना हॉस्पिटलमध्ये पोहचवण्यासाठी मोफत मदत करणार आहे. तसेच त्या ऑटोमध्ये ऑक्सिजन बसवण्यात आलेले आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात गरजूंना मदत होणार असल्याचे मत फेडरेशनचे चेअरमन हाजी इक्बाल यांनी व्यक्त केले.