मुंबई - महाविकास आघाडी सरकारच्या राज्य मंत्रीमंडळाची बैठक आज सायंकाळी पाच वाजता होणार आहे. या बैठकीत शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस अशी खडाजंगी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. औरंगाबाद शहराच्या नामकरणाच्या प्रस्तावावरून ही खडाजंगी होण्याची शक्यता आहे. काल राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाल्यानंतर शिवसेना नेते आणि मंत्री अनिल परब यांनी आज होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत औरंगाबाद शहराचे नाव संभाजीनगर करण्याबाबतचा प्रस्ताव राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ठेवण्यात येईल अशी माहिती दिली होती. मात्र नामकरणाला आधीपासूनच राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांचा विरोध होता.
मतभेद होण्याची शक्यता - सध्या महाविकास आघाडी सरकार कधीही कोसळेल अशी परिस्थिती आहे. अशातच राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिवसेनेकडून असा प्रस्ताव ठेवल्यास महाविकास आघाडीमधील तिन्ही पक्षांमध्येच मतभेद निर्माण होण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी दोन्ही पक्ष खंबीरपणे उभे असल्याचे पक्षांकडून सांगण्यात आले. मात्र आज होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिवसेनेकडून नामकरणाचा प्रस्ताव ठेवला तर दोन्ही पक्ष शिवसेनेच्या विरोधात भूमिका घेऊ शकतील.
शिवसेना बाहेर पडण्याची शक्यता? राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत औरंगाबाद शहराच्या नामकरणाचा प्रस्ताव आल्यास राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाकडून विरोध केला जाऊ शकतो. मात्र औरंगाबाद शहराचे नामकरण संभाजीनगर करण्यात यावे यासाठी शिवसेना आग्रही होती. मात्र महाविकास आघाडी सरकारच्या किमान समान कार्यक्रमांतर्गत नामकरांचा मुद्दा येत नसल्याने याबाबतचा प्रस्ताव अद्यापपर्यंत शिवसेनेने आणला नव्हता. मात्र आता सरकार जाण्यासारखी परिस्थिती असताना औरंगाबाद शहराचे नाम करण्याचा प्रस्ताव आणल्यास काही प्रमाणात का होईना मात्र शिवसेनेला डॅमेज कंट्रोल करता येईल असा एक मतप्रवाह शिवसेनेत आहे. मात्र या प्रस्तावाला इतर घटक पक्षाने विरोध केल्यास महाविकास आघाडीतून शिवसेना बाहेर पडेल अशी शक्यता वर्तवली जातेय. तसेच सध्या सुरू असलेल्या राजकीय उलथापालथी एकनाथ शिंदे यांच्या गटाने महाविकास आघाडी जवळजवळ सोडल्याचे चित्र आहे. त्याचप्रमाणे शिवसेना महाविकास आघाडीतून बाहेर पडेल अशी शिवसेनेचीच योजना होती का? असा सवालही राजकीय वर्तुळात आता विचारला जातोय.
हेही वाचा - Naveen Jindal: आता तुझा नंबर! भाजपचे माजी मीडिया प्रभारी नवीन जिंदाल यांना जीवे मारण्याची धमकी
हेही वाचा - SC On MVA Petition : महाविकास आघाडीचे पुढील भवितव्य सर्वोच्च न्यायालयात आज 5 वाजता होणार स्पष्ट
हेही वाचा - Kishori Pednekar Threat To Kill : मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना जिवे मारण्याच्या धमकीचे पत्र