मुंबई /धुळे/सातारा - मंत्रालयाच्या प्रांगणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज(रविवारी) ध्वजारोहण कार्यक्रम पार पडत असतानाच जळगाव येथील एका शेतकऱ्याने मंत्रालयाच्या गेटवर अंगावर रॉकेल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला. पोलिसांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला. दरम्यान, मरीन ड्राईव्ह पोलिसांनी संबंधित शेतकऱ्याला ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरू आहे.
मुख्यमंत्री ठाकरे यांचे भाषण संपल्यानंतर जळगाव जिल्ह्यातील जामनेर येथील शेतकरी सुनील गुजर यांनी मंत्रालयाच्या गेटसमोर अंगावर रॉकेल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला. शेतीत मोठं नुकसान झाले आहे. घर गहाण ठेवले आहे. घरची परिस्थिती बेताची झाल्याने आत्महत्येशिवाय दुसरा पर्याय नसल्याचे शेतकऱ्याचे म्हणणे आहे.
साताऱ्यात 7 जणांचा आत्मदहनाचा प्रयत्न -
साताऱ्यात स्वातंत्र्य दिनानिमित्त आज (रविवारी) जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात वेगवेगळ्या आंदोलनामुळे पोलीस प्रशासनाची तारांबळ उडाली. आसरे गावातील 7 जणांनी जमीन बळकावल्याचा आरोप करत जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला.
2018 मध्ये आसरे गावातीलच एका प्रतिष्ठित व्यक्तीने सरकारी भूखंड हडप केल्याचा आरोप आत्मदहनकर्त्यांनी केला आहे. या आंदोलनकर्त्यांनी प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे सांगून महसूल अधिकाऱ्यांवर गंभीर स्वरुपाचे आरोप केले आहे. ३ वर्षे झाली तक्रार करुनही कारवाई झाली नाही. उलट आमचीच चौकशी करत असल्याचे त्यांचे म्हणणे होते.
मुरुमाचे पैसे न मिळाल्याने धुळ्यात शेतकऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न
धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील शेवाळे शिवारात असलेल्या शेतामधील मुरुम राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 12 या रस्त्याचे रुंदीकरण करण्याच्या कामासाठी वापरण्यात आला होता. शासनाने दिलेल्या टेंडर संबंधित कंपनी काम करीत आहे. त्याला लागत असलेल्या मुरुमासाठी त्यांनी शहादु निवृत्ती तांबे या मेंढपाळ शेतकऱ्याच्या शेतामधून सदर शेतकऱ्याची कुठलीही परवानगी न घेता मुरूम हा चोरून नेला असल्याचा आरोप शेतकऱ्याने केला आहे. शासनाने त्याच्या शेतातील मुरुम चोरी संदर्भात नुकसानभरपाई मिळावी म्हणून प्रशासनाकडे वारंवार अर्ज करून ठेकेदारावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली होती.
मात्र शहादु निवृत्ती तांबे यांना अद्यापपर्यंत नुकसान भरपाई मिळाली नाही. तसेच ठेकेदारावर देखील गुन्हा दाखल झाला नसल्यामुळे आज त्यांनी स्वातंत्रदिनी धुळे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर जोरदार घोषणाबाजी करत आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला.